डोंबिवली : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना, दुसरीकडे चाचणीसाठी गेलेल्या महिलेचा एक अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने, या वेगवेगळ्या दोन अहवालांमुळे कोरोनाच्या चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, योग्य प्रकारे स्वॅब घेतला न गेल्याने दुसरा रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आला असावा, पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित रुग्ण कोरोना बाधितच आहे. तिने विलगीकरण होऊन उपचार घ्यावेत, असे केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत असताना, दुसरीकडे केडीएमसीकडून कोरोना चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील आजदे आरोग्य केंद्रांतर्गत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने कोरोनाची लक्षणे असल्याने, शनिवारी मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली, यात त्यांचा अहवाल आला. मात्र, त्यांनी त्याच वेळी मंजुनाथ आरोग्य केंद्रातही कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. हे दोन्ही अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, कोरोनाच्या चाचणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
या संदर्भात केडीएमसीच्या साथरोग नियंत्रक विभागाच्या अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील म्हणाल्या, चाचणी दरम्यान त्यांचा स्वॅब योग्य प्रकारे घेतला गेला नसेल, त्यामुळे अहवाल निगेटिव्ह आला असावा, परंतु एकदा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर दुसऱ्यांदा चाचणी करणे कितपत योग्य आहे. सध्या जेव्हा अँटिजन चाचणीत अहवाल निगेटिव्ह येतो, तेव्हा आम्ही आरटीपीसीआर चाचणी करण्यास संबंधित व्यक्तीला सांगतो. एखादा अहवाल जेव्हा निगेटिव्ह येतो, तेव्हा तो खोटा असू शकतो, परंतु ज्यावेळेला पॉझिटिव्ह येतो, तेव्हा तो खराच असतो. त्याबाबत संदिग्धता नसावी. रुग्णांनी तत्काळ विलगीकरण होऊन कोरोनाचे संक्रमण थांबविणे आणि उपचार घेणे गरजेचे असते, असे पाटील यांनी सांगितले.
----------------