लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : जिल्ह्यातील गावपाड्यांमधील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांचा शोध ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका करीत आहेत. या सर्वेक्षणात कोरोनाच्या रुग्णांसह क्षयरोग (टीबी), कर्करोग (कॅन्सर), मधुमेह, सारी आणि उच्च रक्तदाब आदी आजारांचे तब्बल १२ हजार ५०२ सहव्याधी रुग्ण जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये आढळून आल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.
देशात सर्वात जास्त महापालिकांसह दुर्गम, आदिवासी डोंगराळ भागात ठाणे जिल्हा विस्तारलेला आहे. या नागरी, डोंगरी आणि सागरी जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्य शासनाची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. या माेहिमेव्दारे कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आदी तालुक्यांमधील ३३ आरोग्य केंद्रांच्या अखत्यारीतील गांवपाड्यांच्या सहा हजार ६४५ कुटुंबांतील तीन लाख सहा हजार ६४५ जणांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदेने केले आहे. या सर्वेक्षणात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसह टीबी, कर्करोग, मधुमेह, सारी आणि उच्च रक्तदाब आदी गंभीर आजारांच्या १२ हजार ५०२ सहव्याधी रुग्णांचा शोध लागला आहे.
.......
सहव्याधी रुग्णसंख्या खालीलप्रमाणे...
तालुका- प्रा.आ.केंद्र- रुग्णसंख्या
अंबरनाथ- ४ - १०८८
कल्याण- ३ - ४२४१
भिवंडी - ३ - ४४२३
शहापूर- ९ - १६८९
मुरबाड- ९ - २८६१
----------------
* सर्वेक्षण केलेले कुटुंब - ६६४५,
* किती जणांचे सर्वेक्षण - ३०६६४१
* पथकांची संख्या - ६३१
* कर्मचारी संख्या- ३३ पीएचसीचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका
.........