ठाणे : कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे पगार कमी झाले. त्यामुळे घराघरात किचनपासून कटिंगपर्यंत कॉस्टकटिंग सुरू झाले. वायफळ खर्च टाळून किचनपासून कॉस्मेटिक्सपर्यंत खर्च कपात करावी लागली असल्याचे महिला वर्गाने सांगितले. खर्च टाळावा लागत असल्याने बचत करण्याची सवयदेखील कोरोनामुळे लागली असल्याचे त्या म्हणाल्या.
अशी आहे खर्चात कपात
१. भाजीपालाऐवजी कडधान्यावर भर दिला जात आहे.
२. हॉटेलिंग बंद झाल्याने आठवड्याचे दोन हजारांची बचत होत आहे.
३. मास्कमुळे मेकअपची गरज लागत नसल्याने कॉस्मेटिक्सचा खर्च वाचला.
४. ऑनलाइन शाळांमुळे मुलांच्या प्रोजेक्ट्सचा ३००-५०० रुपयांचा खर्च वाचला.
५. आठवड्यातून एकदा फिरायला जाणे बंद आहे
६. पार्सल मागवणे बंद केले आहे
७. मुलांचा बाहेरचा खाऊ बंद केला असून घरात विविध पदार्थ बनविले जात आहे.
८. तेल महाग झाल्याने कॅनऐवजी तेलाच्या पिशव्या आणल्या जात आहेत.
९. २५ किलो ऐवजी ५ किलो तांदूळ भरले जात आहे
१०. मॉलमधील शॉपिंग बंद केली असून, किरकोळ वस्तूंसाठी किराणा दुकानांत जात आहेत
११. नवीन साड्या खरेदी करत नसल्याने ब्लॉऊजच्या शिलाईचा ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा खर्च वाचला आहे.
---------------------
घरात नोकऱ्या नसल्याने तांदूळ आम्ही रेशनिंगचाच खातो. सण-उत्सव दरम्यान करत असलेली कपड्यांची खरेदी बंद केली आहे. आठवड्यातून एकदा फिरायला जायचो, आता दोन वर्षे कुठे गेलो नाही. महिन्यातून हॉटेलला एकदा जात होतो तेदेखील बंद केले आहे.
- मयुरी शिंदे
...........
लहान मुलांना बटर, चीज तसेच, बाहेरचा खाण्याची सवय होती ते खाणे बंद केले आहे. बाहेरून सतत नाश्ता मागविला जात होता, तो बंद केलाय. शॉपिंगदेखील बंद केली आहे. हॉटेलमध्ये आठवड्यातून दोनदा जायचो ते पूर्ण बंद केले आहे. घरगुती पदार्थच खाल्ले जात आहेत.
- दिशा दळवी
....
भाजीपाला महाग असल्याने कडधान्य घरात भरून ठेवले जात आहे. मेकअपच्या सामानाची खरेदी होत होती, तीदेखील बंद केली आहे. शॉपिंग, हॉटेलिंग पूर्ण बंद केली आहे. बचत करून घर चालवावे लागत आहे.
- सोनाली मोरे
..............