ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनांनी केलेल्या उपाययोजनांमुळे ठाणे शहरापाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील पंधरवड्यापासून घट झाली आहे. तसेच या शहरांमध्ये कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. परंतु, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र दररोज रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या दोन्ही शहरांत संसर्ग रोखण्याचे आव्हान कायम आहे.
ठाणे जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते होते. मात्र, त्यानंतर बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस कमी-जास्त असा चढउतार दिसून येत आहे. मागील पंधरवड्यापासून मात्र ठाणे शहरासह भिवंडी आणि उल्हासनगर या शहरांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात तर कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वाधिक असून ते राज्यात प्रथम तर देशात दुसºया क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भिवंडी आणि उल्हासनगर शहरांमध्येदेखील कोरोनामुक्तांच्या संख्येत वाढ होत असून बाधितांची संख्या घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांत एकूण १७ हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भिवंडी शहरातील केवळ २९७ आणि उल्हासनगरातील ४२६ रुग्णांचा समावेश आहे. तर जून आणि जुलै महिन्यामध्ये ठाणे शहरात जिथे दररोज ३०० ते ३५० हून अधिक रुग्ण आढळून येत होते तिथे सध्या १००-१५० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरांत दोन हजार ५८० रुग्ण आढळले आहेत. या तिन्ही शहरांमध्ये योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे.नवी मुंबई, केडीएमसीत अॅक्टिव्ह रुग्ण तीन हजारांवरसध्या भिवंडीत केवळ १८३, उल्हासनगरमध्ये ३२७ आणि ठाणे शहरात एक हजार ७८८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तर मीरा-भार्इंदरमध्ये दोन हजार ८८, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार २८३, बदलापूरमध्ये ७६९ आणि अंबरनाथमध्ये ४६५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या मीरा-भार्इंदरमध्ये एक हजार ४५१, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार ३६०, बदलापूरमध्ये २७८ आणि अंबरनाथमध्ये ३०२ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. याउलट नवी मुंबईत ३,४१६ आणि केडीएमसीत ३,१५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.