ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आर्थिक परिस्थिती नसतांनाही ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केली आहे. परंतु, त्यासाठी निधी कसा उभा करणार या मुद्यावरुन भाजपने लसीकरणावर आक्षेप घेतला होता. त्यावरुन बुधवारी झालेल्या महासभेत भाजपच्या या भुमिकेवरुन महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्यानेच आणि नागरीकांच्या हिताच्या दृष्टीकोणातूनच हा निर्णय घेतला गेला, असतांना त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याचा विरोध भाजपकडून केला जातो कसा असा सवालही यावेळी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी उपस्थित करीत भाजपच्या नगरसेवकांना कोंडीत पकडल्याचे दिसून आले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढावे असे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेने ५ लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे निश्चित केले. परंतु या मुद्यावरुन भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका यासाठी निधी कसा उभारणार असा सवाल उपस्थित करीत, राज्य शासनाकडून सर्व महापालिकांसाठी ग्लोबल टेंडर काढले जाईल, असे स्पष्ट केले असतांनाही महापालिकेने कशासाठी टेंडर काढावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या महासभेत देखील भाजपच्या नगरसेवकांनी लसीकरणासाठी निधी कसा उभा करणार असा सवाल उपस्थित केला. यावरुन नारायण पवार, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील आदींसह भाजपच्या इतर नगरसेवकांनी देखील लसीकरणावरुन मुद्दा उपस्थित केला. परंतु भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या या मुद्यावरुन महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना कोंडीत पकडत त्यांच्यावर पलटवार केला.
केंद्राने वेळेवर लस पुरवठा न केल्यानेच ठाणे महापालिकेवर लस विकत घेण्याची वेळ आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. त्यामुळे ठाणोकरांच्या हिताच्या दृष्टीकोणातून याला पाठिंबा द्यायचा तर विरोध करुन या मोहीमेला खीळ घालण्याचे कामही भाजपकडून सुरु असून भाजपने ही दुटप्पी भूमिका सोडावी आणि राजकारण बाजूला ठेवून या मोहीमेला सहकार्य करण्याऐवजी विरोध करणो अयोग्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर महापौर नरेश म्हस्के यांनी देखील या मोहीमेला यशस्वी करण्यासाठी वेळ प्रसंगी प्रभागातील कामे अर्धी करुन चार रस्त्यांऐवजी दोन रस्ते, करु, पाच गटार पायवाटा करण्याऐवजी ती कामे अर्धी करु मात्र या ग्लोबल टेंडरसाठी निधी उभा करु अशी भुमिका त्यांनी स्पष्ट केली. परंतु राजकारण करुन या मोहिमेला खीळ घालू नका असेही त्यांनी सांगितले.
परंतु केवळ मदतीच्या नावावर बिस्कीट वाटायचे आणि खुर्चांना स्वत:चे स्टीकर लावायचे ही भाजपची भूमिका अयोग्य असल्याचेही टीका त्यांनी केली. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून ग्लोबल टेडंरसाठी पाठींबा द्यावा असेही त्यांनी सांगितले. अखेर आमचा देखील या लसीकरणाला विरोध नाही, मात्र केवळ निधी कसा उभा करणार एवढीच माहिती मिळावी म्हणूनच ही चर्चा केल्याचे भाजपच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले.
लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे सुरु - नरेश म्हस्केया महासभेत सध्या लसीकरण सुरु असलेल्या मोहिमेवरुन देखील भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. काही ठिकाणी जास्तीचा पुरवठा केला जात आहे, काही ठिकाणी ठरवुन लस कमी दिल्या जात आहेत. त्यामुळे ही मोहीम योग्य पद्धतीने राबविण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. त्यानुसार कुठेही दुजाभाव न करता लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे सुरु असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. नियमानुसारच शहरातील केंद्र सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.