ठाणे : ठाणे महापालिकेने ठाणोकरांचे लसीकरण करण्यासाठी पाच लाख लसींचे ग्लोबल टेंडर काढण्याचे निश्चित केले आहे. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता, पाच लाख नाही तर १० लाख लसींचे ग्लोबल टेंडर काढा अशी मागणी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांनी केली. इतर कामांना ब्रेक देऊन त्या कामांचा निधी लसीकरणासाठी वर्ग करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. त्यानुसार या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर रिझन मधील सर्वच महापालिकांना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातच ठाणे महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण, राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण आदींसह इतर सदस्यांनी देखील याविषयी मत व्यक्त करतांना ठाणे शहराची लोकसंख्या ही ३० लाखाहून अधिक आहे. त्यामुळे पाच लाख लसी या अपुऱ्या पडणार असल्याचे मत यावेळी या सदस्यांनी व्यक्त केले.
त्यामुळे गोष्टीचा विचार करुन पाच लाख नाही तर किमान १० लाख लसींसाठी महापालिकेने ग्लोबल टेंडर काढावे असे मत यावेळी सर्वच सदस्यांनी व्यक्त केले. यासाठी निधी अपुरा पडत असेल तर सध्या जी कामे महत्वाची नाहीत, किंवा इतर कामांचा विकास निधी या योजनेसाठी वापरण्यात यावा असेही यावेळी सदस्यांनी सांगितले.
गृहसंकुलांना मोफत लस द्यावीठाणे महापालिकेने लसीकरणाचे धोरण जाहीर केले असले तरी यामध्ये गृहसंकुलांना विकत लस घ्यावी लागणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. परंतु प्रत्येकाला हे शक्य होईल असे नाही, त्यामुळे महापालिकेने गृहसंकुलांना मोफत लस द्यावी अशी मागणी यावेळी स्थायी समिती सदस्य भरत चव्हाण यांनी केली. त्यानुसार कृष्णा पाटील, हणमंत जगदाळे आणि इतर सदस्यांनी देखील ही मागणी लावून धरली. परंतु आता पालिका प्रशासन या बाबत काय निर्णय घेणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे.
या संदर्भात आयुक्तांनी योग्य तो विचार करावा आणि त्यानुसार शहरातील प्रत्येकाला लस मिळेल या दृष्टीकोणातून १० लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावे अशी मागणी आम्ही स्थायी समितीचे सर्व सदस्य करीत आहोत.- संजय भोईर - स्थायी समिती सभापती, ठामपा