ठाणे: दीर्घ आजारपणामुळे तसेच शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या शहरातील रुग्णांना ठाणे महापालिकेच्या वतीने थेट घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या विशेष मोहिमेला शनिवारी सुरुवात झाली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अशा तीन रुग्णांना लस दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ज्या नागरिकांना जागेवरून हालचाल करणेही अवघड जाते. त्याचबरोबर, कर्करुग्ण, अनुवंशिक विकार असलेले, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण किंवा जे बऱ्याच महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २१ नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सहा जणांनी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, १४ ऑगस्ट रोजी पहिल्याच दिवशी माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमधील तीन नागरिकांना लस दिली आहे. घरी तेही फारसा काही त्रास न घेता लस मिळाल्यामुळे, यावेळी सर्व रुग्णांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
* या लसीकरणासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, यासाठी महापालिकेने गूगल फॉर्म तयार केला आहे. नागरिकांना महापालिकेने दिलेल्या एका लिंकवर कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच अशा रुग्णांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. यामध्ये अशा व्यक्तींचे किमान सहा महिने अंथरुणात खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र किंवा नातेवाईक यांचे संमतीपत्र प्रशासनाला सादर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, आजारपणामुळे, तसेच शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.