ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृह संकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणांतर्गत महापालिकेने ठाणे शहरातील जवळपास ८५ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्या रुग्णालयांची यादी देखील सोशल मिडियावर वायरल झाली होती. परंतु अवघ्या एका दिवसात त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Corona Vaccination: Temporary suspension of vaccination centers at 85 private hospitals)
यासंदर्भात काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांशी केलेल्या चर्चेनंतर त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. या रुग्णालयांचा प्रभाग समितीनिहाय सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून पुन्हा सर्व्हे केला जाणार असून त्यानंतर ते केंद्र निश्चित केले जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि या मोहीमेत सुसुत्रता आणण्यासाठी ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी लसीकरणाचे धोरण जाहीर केले होते. या माध्यमातून महापालिकेने दोन दिवसापूर्वी ८५ खाजगी रुग्णालयांना तशी परवानगी देखील दिली होती. त्यानंतर या रुग्णालयांची यादी त्याच दिवशी सोशल मिडियावर वायरल देखील झाली होती. त्यामुळे नागरीक देखील आपल्याला जवळचे रुग्णालय कसे मिळेल याचा शोध घेत होते. परंतु अवघ्या एका दिवसात पालिकेने या निर्णयाला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये काही ठिकाणी जागा नसतांनाही अशांना परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी इमारतीमधील घरात असलेल्या क्लिनीकला देखील परवानगी देण्यात आल्याची बाब विक्रांत चव्हाण यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन परवानग्या कशा चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत, याची माहिती दिली.
उच्च न्यायलायत याचिका झालेली होती, ज्या रुग्णालयांना परवानगी नाकारण्यात आली आहे, जी रुग्णालये अधिकृत नाहीत, अशांची देखील नावे या यादीत असल्याचे दिसून आले आहे. अशी सुमारे ४० ते ४५ नावे यात दिसून आल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्र सुरु करतांना सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून पुन्हा रुग्णालयांना सर्व्हे केला जाणार असून ते रुग्णालय अधिकृत आहे का?, त्याठिकाणी २०० रुग्णांना बसण्याची व्यवस्था आहे का?, त्यानंतर रुग्णालयांना परवानगी दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त गणोश देशमुख यांनी देखील सव्र्हे करुनच रुग्णालयांना परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.