अजित मांडकेठाणे : १ मे पासून १८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. परंतु सध्या रोजच्या रोज लसींचा अपुरा साठा येत असल्याने शहरातील लसीकरण मोहीम कोलमडलेली आहे. महापालिका हद्दीत ५६ लसीकरण केंद्रांपैकी केवळ २६ केंद्र सुरू आहेत. त्यामुळे जी केंद्र सुरु आहेत, त्या केंद्रांवर गर्दी दिसत आहे. त्यामुळे लसींचा साठा उपलब्ध झाला नाही तर १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण कसे करायचे असा पेच ठाणे महापालिकेसमोर आहे.
ठाणे महापालिका हद्दीत जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. सुरुवातीला लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्याने महापालिका हद्दीत टप्प्याटप्प्याने ५६ केंद्र सुरू केली. जोपर्यंत लसींचा साठा उपलब्ध होता तोपर्यंत या ५६ केंद्रांवर रोजच्या रोज लसीकरण सुरु होते. परंतु फेब्रुवारी अखेरपासून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने महापालिकेच्या केंद्रांची संख्या कमी अधिक प्रमाणात सुरु असल्याची दिसून आली. कधी ४५ ते कधी ४० केंद्रावर लसीकरण सुरू होते. त्यात आता अगदी तुटपुंजा प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने मंगळवारी लसीकरण केंद्रांची संख्या २६ वर घसरल्याचे दिसून आले.
लसींच्या साठ्याचे नियोजन करुन पुढील दोन ते तीन दिवस हा साठा पुरविण्यासाठी पालिकेने काही केंद्र बंद केल्याचे दिसून आले. परंतु एका दिवसात तब्बल ३० केंद्रे बंद झाल्याने लसीकरण मोहीम कोलमडल्याचे चित्र शहरात दिसत होते. त्यामुळे ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात ताण वाढल्याचे दिसत होते.
ठामपाने आतापर्यंत २ लाख ७९ हजार १६० जणांचे लसीकरण पूर्ण केले आहे. परंतु प्रत्यक्षात लसींचा साठा पुरेसा उपलब्ध झाला असता तर हे प्रमाण चार लाखांच्या आसपास नक्कीच गेले असते असे पालिकेचे म्हणणे आहे. साठा कमी जास्त प्रमाणात येत असल्याने अशीच परिस्थिती राहिली तर लसीकरण मोहिमेला दोन वर्षेही कमी पडतील असेही आता बोलले जात आहे.
१ मे नंतरचे नियोजन काय?
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या लसींच्या पुरवठ्यावर केंद्रांचे नियोजन केले जात आहे. परंतु आता १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्याचे निश्चित झाल्याने प्रत्येक केंद्रावर गर्दी वाढणार आहे. याचा अंदाज पालिकेला देखील आहे, त्यामुळे लसींच्या साठ्यावर लसीकरण केंद्राचे नियोजन केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ज्यांना लस घ्यायची असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने कोणालाही लस दिली जाणार नसल्याचे सध्या तरी सांगितले जात आहे. म्हणजेच जेवढे नोंदणी केलेले असतील तेवढेच केंद्रावर आले तर गर्दी देखील कमी होऊ शकणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करणे देखील सोपे जाणार आहे.