लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना प्रतिबंधक कुपी म्हणजे लसची बाॅटल उघडताच अवघ्या चार तासांत लाभार्थ्यांना डोस देऊन ती संपवायची आहे. त्यासाठी कमीत कमी दहा किंवा दहाच्या पटीत लाभार्थी असल्याची खात्री करावी लागत आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्यकेंद्रात लसीकरणास प्रारंभ केला जात असल्याचे वास्तव ग्रामीण भागात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात अद्यापही कोरोना प्रतिबंधक लसच्या लाभार्थ्यांचे पाय लसीकरण केंद्रांकडे फारसे वळत नाही. त्यामुळे केंद्राबाहेरच्या उपस्थितांमध्ये लस घेणाऱ्या इच्छुकांची संख्या लक्षात घेऊनच कुपीचे झाकण उघडून इंजेक्शन भरले जात आहे. या गावपाड्यातील लाभार्थी सकाळी काही प्रमाणात म्हणजे १०० च्या आसपास लसीकरण केंद्राबाहेर आढळतात. पण दुपारनंतर मात्र लाभार्थ्यांची रांग रोडावलेली दिसते. दहा पेक्षाही कमी लाभार्थी रांगेत दिसतात. त्यामुळे कमीत कमी दहा जण झाल्याची खात्री पटल्यानंतर लसची बाॅटल उघडण्याची खबरदारी गावखेड्यातील लसीकरण केंद्रांवर सध्या घेतली जात आहे.
शहरातील लसीकरण केंद्रांवर ग्रामीण भागाच्या उलट परिस्थिती आहे. सकाळचा नाश्ता घरी न घेता केंद्रांवरील रांगेत उभे राहून घेणाऱ्यांची संख्या शहरातील लसीकरण केंद्रांवर सध्या पाहायला मिळत आहे. तोबा गर्दी दिसत आहे. चेंगराचेंगरी तर नित्याचीच. पण आपल्या नंबराच्या पुढे कोणी घुसणार नाही, याकडे जातीने लक्ष दिले जात आहे. दीड ते दोन तास रांगेत उभे राहून; लस संपल्याचे अचानक ऐकवले जाते आणि या उपेक्षित लाभार्थ्यांचा संताप अनावर होत असल्याचे शहरात पाहायला मिळत आहेत. पण ग्रामीण भागतील लसीकरण केंद्रांवर दहा लाभार्थ्यांची रांग पाहण्यासाठी केंद्रांवरील कर्तव्यदक्षतांच्या नजरा आतुरलेल्या दिसत आहे.