सदानंद नाईक
उल्हासनगर : नागरिकांत लसीकरणा बाबत जनजागृती झाल्याने महापालिका लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या लसीसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे व वैधकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी केंद्राची पाहणी करून नगरिकाकडून समस्या एकून घेतल्या.
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने शहर पूर्वेतील शाळा क्रं-२८ मध्ये व पश्चिम मध्ये आयटीआय कॉलेज इमारती मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. तसेच मध्यवर्ती रुग्णालय व काही खाजगी रुग्णालयात लसीकरणाला मंजूरी देण्यात आली. महापालिका लसीकरण केंद्रावर नागरिकांनी एकच गर्दी केली असून सकाळी ६ वाजल्या पासून नागरिक लसीकरणासाठी रांगेत उभे राहत आहेत. ऑनलाईन नोंदणी व ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येत असून केंद्रावर सुरक्षरक्षकांची मागणी केली जाते. एका सुरक्षारक्षक व पोलिसाला नागरिकांची गर्दी आवरणे कठीण जात असून यामधून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे यांनी प्रभाग अधिकारी पंजाबी यांच्या समवेत केंद्राची पाहणी केली.
महापालिका वैधकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनीही शुक्रवारी केंद्राची पाहणी करून नागरिकांनी स्वतःहून सोशल डिस्टन्स ठेवून लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. सर्वांना लस मिळणार असून विनाकारण केंद्रावर गर्दी करू नका. असे ते म्हणाले. लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या गर्दी होत असल्याने, लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. दरम्यान महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी अतिरिक आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह प्रभाग अधिकारी व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शहरातील कोरोना रुग्ण व आरोग्य सुविधेबाबत आढावा घेऊन काहीं सूचना केल्या. तसेच काही अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांच्या कामाबाबत असमाधान व्यक्त केले.
लसीकरण केंद्राची संख्या वाढणार
महापालिका लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागून लसीकरणासाठी नागरिकांत वाद निर्माण होत आहे. लसीकरण वाढविण्यासाठी केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी होत असून अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी केंद्र वाढविण्याचे संकेत दिले.