ठाणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात लसींचा साठा अपुरा पडू लागला होता. ठाण्यात तर वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानंतर आता जिल्ह्याला ८५ हजार लसींचा साठा मिळाला आहे. त्यामुळे लसीकरण उत्सव दोन दिवसच चालण्याची शक्यता आहे. सोमवारी किंवा मंगळवारी आणखी ८१ हजार लसींचा साठा मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गेल्या काही दिवसांपासून लसींअभावी लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला होता, तर लसींचा साठा अपुरा असल्याने वीकेंड लॉकडाऊनचे कारण देऊन ठाण्यासह अनेक ठिकाणी लसीकरण दोन दिवस बंद ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार लसींचा उत्सव कसा साजरा करायचा असा पेच यंत्रणांपुढे होता. परंतु, आता जिल्ह्यासाठी सोमवारी ८५ हजार लसींचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्याचे वाटपही झाले आहे. या सर्व लसी कोविशिल्डच्या असल्याचे सांगण्यात आले. परंतु, उपलब्ध साठा वितरित केल्यानंतर प्रत्येक महापालिकेच्या वाटेला दीड हजार ते २० हजारपर्यंत साठा मिळाला आहे. त्यामुळे तो किती दिवस पुरणार, असा प्रश्न महापालिकांना पडला आहे. पुढील दोन दिवस पुरेल एवढा हा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्यानंतर काय करायचे असा पेच आहेच. त्यामुळे लसीकरणाचा उत्सव कसा साजरा करायचा, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे सोमवारी सांयकाळी किंवा मंगळवार सकाळपर्यंत आणखी ८१ हजार लसींचा साठा उपलब्ध होणार आहे.
लसींचा पालिकानिहाय साठामहापालिका मिळालेला लसींचा साठाठाणे १५,०००नवीमुंबई २०,०००कल्याण डोंबिवली १२,०००उल्हासनगर १५००भिवंडी १५००मीरा-भाईंदर १५,०००ठाणे ग्रामीण २०,०००एकूण ८५०००