ठाणे : कोरोनामुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला आहे तर दुसरीकडे सामाजिक संस्थाही आपली जबाबदारी पार पाडत आहे. ठाण्यातील झेप प्रतिष्ठान ही 'प्रोजेक्ट एकलव्य' २०२१ अंतर्गत कोरोनामुळे घरात कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार आहे. दोन दिवसांत ९० गरजूंनी संस्थेशी संपर्क केला आहे.
झेप प्रतिष्ठान या ठाण्यातील संस्थेतर्फे एक अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी कोणत्याही कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांना शैक्षणिक मदत करण्याचा निर्धार केला आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या कुटुंबाचा आधारवडच गणावल्यानंतर अशा मुलांच्या शिक्षणाची होणारी परवड ही अटळ आहे. यामुळे कदाचित मुलांची शाळेतून गळती होईल आणि त्यांची वाट बालकामगाराकडे जाईल, तसेच या मुलांच्या शिक्षणात खंड पडून ही मुले कदाचित वाममार्गाला लागण्याचीही भीती आहे.
हे सर्व थांबविण्यासाठी झेप प्रतिष्ठान या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार आहे जेणेकरून ही मुले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करु शकतील. प्रोजेक्ट एकलव्य असे या उपक्रमाचे नाव असून या उपक्रमात नाव नोंदणी करणे गरजेचे आहे असे झेप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांनी सांगितले. त्यानंतर या मुलांच्या कुटुंबाची भेट घेऊन आणि कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर त्यांना मदत दिली जाईल.
यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचे आवाहन झेप प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविला जात आहे, असे धनवडे म्हणाले. झेप प्रतिष्ठानने गेल्यावर्षी मिशन २०२०मध्ये जव्हार येथे १००० मुलांना किट दिले होते. दरम्यान, अधिक माहितीसाठी 9700712020 या क्रमांकावर संपर्क करण्याचे तसेच याच नंबरवर आपली मदत आपण पाठवू शकता.