ठाणे : परदेशात काही कामांनिमित्त किंवा पर्यटनाला कुटुंबासह गेलेल्यांपैकी ९८ जण भारतात परतले आहेत. सर्व जण कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील रहिवासी असून, त्यांच्यापैकी २४ जण चीनमधून आल्याची माहिती पुढे आली आहे.या ९८ पैकी एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही, हे सर्व आता निगराणीखाली असून स्थिर आहेत. विशेष म्हणजे, त्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पालघरसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात परदेशातून परतले आहेत. यात १४ दिवसांची निगराणी पूर्ण करणारे २८ जण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो नागरिकांचा जीव गेल्यामुळे जगभरात हाय अॅलर्ट जाहीर केला आहे. सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने, तो होऊ नये याची खबरदारी घेणे हाच पर्याय उरला आहे. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मास्कचा तुटवडा सर्वत्र निर्माण झाला आहे. दुसरीकडे परदेशात गेलेले भारतीय नागरिक भारतात परतत मायदेशी परतत आहेत.
कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत १० मार्चपर्यंत एकूण ९८ नागरिक परदेशवारी करून परतले आहेत. कोरोना विषाणूबाबतची विशेष खबरदारी म्हणून या प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, दक्षता म्हणून त्यांना १४ दिवसांच्या निगराणीसाठी ठेवले आहे. त्यातून २८ जण त्या दिवसांच्या निगराणीतून बाहेर पडले आहेत, तसेच उर्वरित ७० जण हे स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिकानिहाय कक्ष तयारजिल्हा प्रशासनाने खबरदारी घेऊन ठाणे जिल्ह्यातील महापालिकानिहाय कक्ष तयार करून बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. त्यानुसार, ठाणे सिव्हिलमध्ये सात बेड्स आणि एक व्हेंटिलेटर ठेवले आहे. तसेच ठामपाच्या कळवा आणि नवी मुंबईच्या वाशी रुग्णालयात प्रत्येकी आठ बेड्स आणि एक व्हेंटिलेटर, भिवंडीतील इंदिरा गांधी येथे सहा आणि खासगी रुग्णालयात २० बेड्स, उल्हासनगर येथे सहा, पंडित भीमसेन जोशी मीरा-भाईंदरमध्ये दहा, मालाड-मालवणी येथे सहा, तसेच क ल्याण-डोंबिवली महापालिका रुग्णालयात दहा बेड्स उपलब्ध ठेवल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.या देशातून आले प्रवासीठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांत एकूण ९८ नागरिक परदेशातून आले आहेत. त्यामध्ये चीनमधून-२४, इराण-३०, इंडोनेशिया आणि सिंगापूर ३६ तसेच इटली, थायलंड येथून आलेल्या आठ नागरिकांचा समावेश आहे.