लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या लढाईमध्ये खाकी वर्दीतील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या एका योद्धयाने आगळया वेगळया प्रकारे लढा द्यावा लागला. गेल्या २० दिवसांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घरी न जाताच पोलीस ठाण्यातूनच आपले कर्तव्य बजावले आहे. तर उर्वरित इतर दोन पोलीस निरीक्षकही १४ दिवस पोलीस ठाण्यातच कॉरंटाईन झाले होते. त्यामुळे या तिन्ही पोलीस अधिका-यांचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी महाराष्ट्र दिनी विशेष कौतुक केले.राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे १३ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यामुळे या आरोपींच्या संपर्कातील वरिष्ठ निरीक्षकांसह २४ पोलिसांना कॉरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, यातील २४ पैकी तीन पोलीस कर्मचा-यांचीही कोरोनाची तपासणी १५ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे १३ एप्रिल पासून विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिलेल्या वरिष्ठ निरीक्षक गायकवाड आणि निरीक्षक संतोष घाटेकर यांनी पोलीस ठाण्यातच स्वत:ला कॉरंटाईन करुन घेतले. अर्थात, या अधिकाºयांना शक्य झाले असते तर त्यांना घरीही विश्रांतीसाठी जाता आले असते. तशी त्यांना आयुक्त आणि उपायुक्तांनीही परवानगी दिली होती. मात्र, कोरोनासारख्या लढाईत आपण घरी राहण्यापेक्षा कार्यालयात कोरंटाईन राहू, असा निर्धान व्यक्त करीत १३ ते २७ एप्रिल या १४ दिवसांसह उर्वरित दिवसांमध्येही गायकवाड घरी गेले नाही. तर या १४ दिवसांमध्ये घाटेकर हे देखिल पोलीस ठाण्यातच कॉरंटाईन झाले. मात्र, फोन, एसएमएस आणि मेलद्वारे त्यांनी आपले कामकाज चालू ठेवले. पोलीस ठाण्यावरही नियंत्रण ठेवले. शिवाय, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर आणि सावरकरनगर या संपूर्ण परिसरावर त्यांनी करडी नजर ठेवली. याच काळात सुमारे विनाकारण फिरणारी ५५ वाहनेही वर्तकनगर पोलिसांनी जप्त केली. अन्य एक निरीक्षक रमेश जाधव यांना कॉरंटाइन केले नव्हते. पण तेही या काळात पोलीस ठाण्यातच थांबले. विशेष म्हणजे संचारबंदी लागू झाल्यापासून २५ मार्च ते ३० एप्रिल या ३५ दिवसांमध्ये केवळ ११ एप्रिल रोजी गायकवाड घरी गेले. त्यानंतर ते ऐरलीतील घरी गेलेच नाही. आता मात्र, त्यांचे कुटूंबीय घरी परत कधी येणार अशी विचारणा करीत असल्याचे ते म्हणाले. आता कोरोनाला हरवायचे हे एकच लक्ष्य असल्याचा निर्धान त्यांनी व्यक्त केला.
‘‘ वर्तकनगर पोलीस ठाण्यातील ९५ पैकी तिघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तीन अधिकारी २७ कर्मचा-यांना कॉरंटाईन व्हावे लागले. अशा परिस्थितीत कोणत्याही कर्मचा-याचा आत्मविश्वास डळमळीत होऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे माझ्यासह घाटेकर आणि निरीक्षक तिघांनीही घरी न जाण्याचा निश्चय केला. पोलीस ठाण्यात थांबून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. शिवाय कोरोनाचा संसर्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतली.’’संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे