ठाणे : शहरातील ज्या आस्थापना, दुकाने सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापराच्या नियमांचा भंग करतील, त्या तत्काळ सील करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी परिमंडळ उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना दिले.
वाढत्या कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून त्यांनी सोमवारी कळवा प्रभाग समितीचा दौरा केला. मात्र, मुख्य म्हणजे कळवा मार्केट, कळवा पूर्व परिसर अशा परिसरांत दौरा खऱ्या अर्थाने करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांनी त्यांना मनीषानगर, खारेगाव, पारसिकनगर, ओझोन व्हॅली अशा स्वच्छ परिसरात फिरवून तो आटोपल्यामुळे या दौऱ्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यामुळे तो केवळ दिखावा ठरला.
सुरुवातीला त्यांनी कळवा प्रभाग समितीच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून कोरोनाची परिस्थिती समजून घेतली. यामध्ये योग्य पद्धतीने फवारणी आणि स्वच्छता होते की नाही तसेच झोपडपट्टी परिसरात टेस्टचे प्रमाण कमी असल्याबद्दलदेखील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ही बैठक झाल्यानंतर त्यांनी थेट मनीषानगर परिसरात जाऊन पाहणी केली, त्यानंतर थेट खारेगाव आणि पारसिकनगर परिसरात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी शौचालयांमध्ये स्वच्छता आहे की नाही, याचीदेखील तपासणी केली.
मार्केटमध्ये सकाळपासूनच कारवाई करा. भाजी मार्केट हे सकाळपासूनच सुरू होत असून या ठिकाणी सकाळी लवकर भाजीविक्रेते येतात. त्यामुळे १० नंतर कारवाई करण्यापेक्षा सकाळी लवकर कारवाई करण्यास सांगून हॉल, मंडप डेकोरेटर यांच्यावरदेखील कारवाईचे आदेश दिले.