कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण नव्याने आढळून येण्याचे प्रमाण जास्त असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के आहे. हे प्रमाण वाढत असल्याने ही एक समाधानकारक बाब असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या १० हजार ९६२ होती. एका दिवसात १ हजार ७५२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मृत्युदर हा १.१९ टक्के आहे. त्यामुळे मृत्युदर कमी आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ही जमेची बाजू आहे.
महापालिका हद्दीत दररोज ४ हजार ५०० जणांची अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जाते. रुग्ण आढळण्याचा दर हा १४.७४ टक्के आहे. मागच्या महिन्यात तो २३ टक्के होता. आरोग्य मंत्रालयाच्या निकषानुसार हा दर १० टक्क्यांच्या आत हवा. तो कमी करण्यासाठी महापालिकेकडून चाचण्या वाढविल्या जाणार आहेत. महापालिका हद्दीत सध्या ३२ चाचणी केंद्रे आहेत. ती वाढविण्यात येणार आहे. यापूर्वी दिवसाला पाच हजार जणांची चाचणी केली जात होती. मात्र सध्या संचारबंदीमुळे प्रवासावर बंदी असल्याने चाचणीचे प्रमाण ५००ने घटले आहे. तरी चाचणी वाढविण्याकरिता महापालिकेच्या हेल्थ पोस्टमध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरु ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. महापालिकेने आता नव्याने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, टेक्निशियनची कंत्राटी भरतीची प्रक्रिया राबविली आहे. ही पदे भरल्यास चाचणी केंद्रे वाढविणे शक्य होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत १ लाख ७३ हजार ७२६ जणांचे लसीकरण
जानेवारी महिन्यापासून महापालिका हद्दीत लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख ७३ हजार ७२६ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी लसीचा पहिला डोस १ लाख ४८ हजार ३७२ जणांना देण्यात आला आहे. दुसरा डोस २५ हजार ३५४ जणांना दिला गेला आहे.
सध्या लसीचे डोस केंद्राकडून उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची प्रक्रिया मंदावली आहे. महापालिकेची आणि खासगी लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहे. केवळ कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचे लसीकरण केंद्र सुरू आहे. १८ ते ४५ वयोगटादरम्यानच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. दिवसाला केवळ ५०० डोस उपलब्ध होत आहेत.
ऑनलाइन स्लॉट रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लसीचा डोस दिला जात आहे. महापालिकेने सात लाख लसीच्या डोसची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होताच महापालिकेच्या अन्य लसीकरण केंद्रासह खासगी रुग्णालयातील लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांनी दिली आहे.