ठाणे : ठाण्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत शहरात २२ रुग्ण आढळले होते. त्यात मंगळवारी आणखी दोन रुग्णाची भर पडली आहे. एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्याच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझीटीव्ह आला आहे. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंब्य्रात आता आणखी एका रुग्णाची भर पडल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे मुंब्य्राची आकडेवारी तीन झाली असून आतापर्यंत त्यात एकाचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे आता शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही २४ झाली आहे. काही दिवसांपूर्वी रामचंद्र नगर भागात असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या पत्नीलाही पालिकेने क्वॉरान्टाइन केले होते. आता तिचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आता सुरु झाला आहे.दुसरीकडे गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहन करुनही मुंब्य्रात मात्र रस्त्यावर गर्दी होतांना दिसत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील येथील नागरीकांना आवाहन केले होते. अखेर या भागात मंगळवार पासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असेल तरी नागरीक रस्त्यावर विनाकारण फिरतांना दिसत होते. त्यातच मंगळवारी मुंब्य्रातील अमृत नगर भागात आधीच्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेचे डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली आहे. तर आतापर्यंत मुंब्य्रात तीन रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यु झाला आहे. तर शहराचा कोरोना बाधीतांचा आकडा हा २४ वर गेला आहे.
वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागणी, शहरात दिवसभरात दोन रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 6:35 PM