कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात फीत कापल्यानंतर कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात झाली. मनपाच्या आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांना पहिली लस घेतली. त्यानंतर त्यांनी ‘कोरोनाची काळ रात्र संपली ’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.कोरोना लसीचे सहा हजार डोस केडीएमसीला मिळाले असून, ती चार केंद्रांवर पहिल्या टप्प्यात दिली जात आहे. लस घेतल्यानंतर डॉ. पाटील म्हणाल्या, लसीकरणासाठी सर्व व्यवस्था सज्ज आहे. लसीच्या साईड इफेक्टविषयी अनेकांना भीती आहे. मात्र, लस सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर ती घेणाऱ्यास अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात येत आहे. सर्व सुविधा त्यासाठी उपलब्ध आहेत.डॉ. सूर्यवंशी म्हणाले, लसीकरणास सुरुवात झाली असून, हा आमच्या सगळ्य़ांसाठी आनंदाचा दिवस आहे. डॉक्टर व नर्स स्वत: लस घेऊन नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी विश्वास निर्माण करत आहेत. कोरानाच्या लढ्यात बोगद्यापलीकडे अंधार होता. आता लस आल्याने प्रकाश दिसला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, ‘सामान्यांकडून लसीच्या साईड इफेक्टविषयी रोज विचारणा होत होती. त्यांच्या मनातील लसीविषयीची भीती घालविण्यासाठी मी लस घेतली आहे.’ रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉ. प्रज्ञा टिके लस घेतल्यानंतर म्हणाल्या, ‘माझे पती डॉ. पुरुषोत्तम टिके हे रुग्णालय अधीक्षक आहेत. मुलगा डॉ. पार्थ हा नायर रुग्णालयात इंटर्नशीप करतो. कोरोनाकाळात आम्ही सेवा दिली. आम्हाला कोरोना झालेला नसली, तरी आम्ही लस घेतली आहे.’रुक्मिणीबाई रुग्णालयातील वॉर्डबॉय वसंत कुलकर्णी यांना ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. लस घेतल्यानंतर ते म्हणाले की ‘आता निर्धास्त झाल्यासारखे वाटत आहे.’ वॉर्डबॉय प्रवीण शिंदे यांनीही लस घेतली आहे. लस देणाऱ्या परिचारिका प्रियंका गोडसे यांनी सांगितले की, ‘काही त्रास झाल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. लस घेतल्यावरही नियम पाळायचे आहेत. २८ दिवसानंतर दुसऱ्या डोससाठी तुम्हाला मेसेज येईल.
लसीकरणाबाबत उत्सुकता -- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दिल्लीत लसीकरणाचा प्रारंभ झाला. हा सोहळा लॅपटॉपवर कर्मचाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर रुक्मिणीबाई रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ आयुक्तांच्या हस्ते झाला.- फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी प्रत्येक खुर्चीत अंतर ठेवले होते. परिचारिका, आशा सेविका यांनी लस घेण्यासाठी रांग लावली होती. लसीकरणाविषयी त्यांच्यात प्रचंड उत्सुकता होती. लस दिल्यावर सर्व कर्मचारी टाळ्य़ा वाजवून लस घेणाऱ्याचे कौतुक करत होते.- रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच दुसऱ्या मजल्यावरील लसीकरण कक्षाबाहेरही लसीकरणाची रांगोळी काढण्यात आली होती.