ठाणे : शहरातील दुकानांची वेळ १ जूनपासून वाढवून दिल्यानंतर ठाणेकर सोमवारपासून थेट छत्र्यांच्या खरेदीकडे वळले. कोरोनामुळे छत्र्यांमध्ये यंदा फारसे नवीन प्रकार आले नसले, तरी काही दुकानांत खरेदी जोरात सुरू असल्याचे आढळून आले.
पावसाळा आला, की दरवर्षी छत्री, रेनकोटची खरेदी केली जाते. उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात खरेदीसाठी ग्राहक येण्यास सुरुवात होते. दुकानेदेखील रंगीबेरंगी छत्र्यांनी नटलेली दिसून येतात. यंदा ३१ मेपर्यंत दुकानांची वेळ सकाळी ११ वाजेपर्यंत असल्याने ठाणेकरांना छत्र्यांची खरेदी करता आली नाही. शासनाने १ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करत दुकानांची वेळ ११ वरून दुपारी २ वाजेपर्यंत केल्याने, तसेच जूनच्या पहिल्याच तारखेला पावसाने हजेरी लावल्याने गेले दोन दिवस दुकानांत छत्र्यांची खरेदी होत आहे. शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी छत्र्या, रेनकोट विक्रीसाठी आले आहेत. बाजारामध्ये विविध रंगांच्या, आकारांच्या छत्र्या व रेनकोट उपलब्ध आहेत. लहान मुलांमध्ये खास करून फेमस असणारे कार्टून्सचे डिझाइन छत्र्यांमध्ये दिसत असून मोटू-पतलू, छोटा भीम यांचे चित्र असलेल्या छत्र्यांना बच्चे कंपनीची, तर बॉबी डॉलचे चित्र असणाऱ्या छत्रीला लहान मुलींची पसंती असते. महिलांची पसंती ही टू-फोल्ड, थ्री-फोल्ड पद्धतीच्या छत्र्यांना असते. कॉलेजच्या तरुणाईची पसंती मात्र फॅन्सी छत्र्यांना कायम आहे.
-----
यंदा तरुणींसाठी फ्रील छत्री आली आहे. पुरुषांची सुपर जम्बोला मागणी कायम आहे, तर गोल्फ छत्रीलादेखील महिला आणि तरुणी पसंती देत आहेत. २०० पासून ८०० रुपयांपर्यंत छत्र्यांची किंमत आहे.
-------------------------------
यंदा कोरोनामुळे दर वाढविले नाहीत. छत्र्यांचे तेच प्रकार याही वेळेस आले आहेत. कोरोनाचे सावट असले तरी छत्र्यांची खरेदी मात्र घटलेली नाही.
अक्षय सुराणा, छत्री व रेनकोटचे होलसेल व्यापारी
---–-----------------------------
या वेळेस कोरोनामुळे ग्राहक ज्या छत्र्या उपलब्ध आहेत त्याच खरेदी करीत आहेत. यंदा आम्ही दर वाढविलेले नाहीत.
गणेश सावंत, छत्री विक्रेते
----------------
यंदा रेनकोटचे दरदेखील वाढले नसून ४०० रुपयांपासून रेनकोट खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
----------