ठाणे : कोराना हा संर्सगजन्य आजार असल्याने सर्वांनाच दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. कारण करोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी ठाण्याच्या वाहतूक विभागाने खबरदारी घेऊन त्यांच्याकडे असलेल्या ५४ मद्यतपासणी (ब्रेथ अॅनालायझर) यंत्रांचा वापर करण्यास कर्मचारी/अधिकाऱ्यांना मनाई केली आहे. या संदर्भात आदेशच काढला असून तो संपूर्ण पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रात लागू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना या जीवघेण्या आजाराचे रुग्ण आढळल्याने राज्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने हायअलर्ट जारी केला असून, सर्वत्र काळजी घेतली जात आहे. धुळवडीच्या सणावरही त्याचा परिणाम दिसून आला आहे. शासनाने याआधीच नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हस्तांदोलन अथवा अलिंगण टाळावे, मास्क वापरावेत, असे आवाहन करून योग्य खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आता ठाणे पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मद्यप्राशन करून गाडी चालविणाऱ्यांचे प्रमाण तपासण्यासाठी मद्यतपासणी यंत्राचा वापर केला जातो. ते घेऊन वाहतूक पोलीस नाक्यांवर उभे असतात. संशयित व्यक्तीच्या तोंडात यंत्राचा पाइप टाकून त्याला फुंकण्यास सांगितले जाते. त्यानंतर ती व्यक्ती मद्य प्यायली आहे का? त्याचे प्रमाण किती? हे पाहिले जाते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, आता कोरोना व्हायरसची भीती पसरल्याने मद्यतपासण्याची ही पद्धत सध्या बंद करून त्याऐवजी नाकाबंदीत असा मद्य पिणारा कोणी संशयित आढळला तर त्याला थेट डॉक्टरांकडे नेऊन त्याची तपासणी केली जाणार आहे. ठाणे वाहतूक विभागाने हा आदेश काढला आहे. तो संपूर्ण पोलीस आयुक्तालय परीक्षेत्रात लागू असून, वाहतूक पोलिसांकडे देण्यात आलेली ५४ यंत्र जमा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा व्हायरस संसर्गजन्य आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडे असलेल्या ब्रेथ अॅनालायझर यंत्राचा वापर सध्या थांबविला आहे. त्याऐवजी आता मद्य पिऊन गाडी चालवित असताना कोणी संशयित आढळला, तर त्याला नजीकच्या रु ग्णालयात नेऊन डॉक्टरांकडून त्याची तपासणी केली जाते. मद्याचे सेवन केल्याचे तपासणीत आढळून आले तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात पाठविले जाते. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग ठाणे