ठाणे : कळव्यातील मनिषा नगर भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता ठाण्यातील वृंदावन भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. येथील एका ६७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार रात्री उशिरा त्याला क्वॉरन्टाइन करुन कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तो दुबई येथे पत्नी आणि मुलासमवेत गेला होता. त्यामुळे आता त्याची पत्नी आणि मुलालाही पालिकेने घोडबंदर भागातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे ठाण्यात आणखी एका वैद्यकीय सेवा देणाऱ्यासही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाणे शहरात आता कोरोना बाधीतांची संख्या ही २१ झाली आहे. रविवारी दिवसभरात शहरात तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यात एका रुग्णाची भर पडली. हा रुग्ण वृंदावन भागातील असून तो ६७ वर्षांचा आहे. फेब्रुवारी महिन्यात तो पत्नी आणि मुलासह दुबईला फिरण्यास गेला होता. त्यानंतर १० मार्चच्या आसपास तो पुन्हा भारतात आला. त्यानंतर या संपूर्ण कुटुंबाने स्वत:ला क्वॉरन्टाइन केले होते. तसेच त्यांची एक दिवस आड तपासणी देखील केली जात होती. विशेष म्हणजे या वृध्द व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणे आढळून आली नव्हती. तसेच त्यांना डायबीजचा त्रासही आहे. मधल्या काळात त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यामुळे ते येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. मात्र आधी तुमची कोरोना तपासणी निगेटीव्ह आहे का ते दाखवा त्यानंतरच तुमच्यावर उपचार करु असे रुग्णालय प्रशासनाने त्यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसापूर्वी कोरोनाची चाचणी केली होती. त्यानंतर रविवारी त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांची पत्नी आणि मुलगा यालाही घोडबंदर भागातील कासारवडली येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान आता सुरक्षिततेचा उपाय म्हणून येथील ५०० मीटरचा परिसर सील करण्यात आला असून ते ज्या इमारतीत राहत होते ती इमारत आणि आजूबाजूच्या पाच ते सात इमारती देखील सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय सोमवारी येथील केवळ औषध दुकाने वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच संबधींत व्यक्तींच्या संपर्कात इतर कोणी आले होते, का? याचाही शोध पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे.
दुसरीकडे कळवा भागातील मनिषा नगर सापडलेल्या एका कोरोना रुग्ण हा ठाण्यातील नौपाडा भागातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. परंतु त्यावर उपचार करणाºया खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्यासही आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तो २८ वर्षीय असून त्याच्यावर आता त्याच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच या वैद्यकीय सेवा देणाऱ्याच्या संपर्कात आणखी कीती नागरीक आले आहेत, त्याची माहिती गोळा करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहे.