डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता कोरोनाचे हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्याप्रमाणे पूर्वेतील तुकारामनगरमधील हॉटस्पॉट क्षेत्र सोमवारी सकाळी सील करण्यात आले होते. परंतु, नागरिकांनी त्याला विरोध करीत ते सील काढल्याचे दुपारी पाहायला मिळाले. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, तर दुसरीकडे हॉटस्पॉट सील करण्यास होणारा विरोध पाहता कोरोनाचे संक्रमण रोखायचे कसे, असा प्रश्न केडीएमसीला पडला आहे.
डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिमेत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मनपा हद्दीत ४४ हॉटस्पॉट आहेत. महापालिका क्षेत्रातील अ प्रभागात तीन, ब आणि ह प्रभागात प्रत्येकी सहा, क प्रभागात सात, जे आणि ड प्रभागामध्ये प्रत्येकी तीन, फ आणि ग प्रभागात प्रत्येकी पाच, आय प्रभागात दोन आणि ई प्रभागात चार हॉटस्पॉट आहेत. सध्या अनलॉकमध्ये नागरिकांचे नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. हेच चित्र हॉटस्पॉटमध्ये निर्बंध घालूनही सदैव दिसत आहे.
परिणामी, हॉटस्पॉटमधील रुग्णसंख्येवर अंकुश ठेवताना अधिकाऱ्यांची कसोटी लागत आहे. दरम्यान, आता हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा सील करण्याची कार्यवाही महापालिकेकडून सोमवारी सुरू झाली. तुकारामनगरमधील हॉटस्पॉट क्षेत्र ग प्रभाग कार्यालयाने सील केले होते. परंतु, नागरिकांच्या विरोधानंतर ते सील काढून टाकण्यात आले.
आयुक्तांच्या आदेशानुसारच कार्यवाही
कोरोना रुग्णसंख्येवर अंकुश आणण्यासाठी सद्य:स्थितीला अॅण्टीजेन चाचणीत वाढ करण्यात आली आहे. त्याबरोबर आता हॉटस्पॉट सील करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत महापालिका सूत्रांचे आहे. नागरिकांचा होत असलेला विरोध पाहता यापुढे आयुक्तांच्या लेखी आदेशानुसारच कार्यवाही केली जाईल, असाही पवित्रा त्यांनी घेतला आहे.