डोंबिवली: कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील वाढते कोरोनाचे रूग्ण पाहता कोरोनाचे हॉटस्पॉट क्षेत्र पुन्हा एकदा सील करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. केडीएमसी परिक्षेत्रात सध्या ४४ हॉटस्पॉट आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या कार्यवाहीत हॉटस्पॉट क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना ये-जा करण्यास बंदी घातली असून केवळ अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.शनिवारपर्यंत कोरोनाची रूग्णसंख्या ३४ हजार ६८६ पर्यंत पोहचली आहे. तर मृतांची संख्या ७२१ आहे. वाढणाऱ्या रूग्णसंख्येचा एकूणच आढावा घेता डोंबिवली पूर्व आणि कल्याण पूर्व- पश्चिममध्ये सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. महापालिका क्षेत्रातील अ प्रभागात 3, ब आणि ह प्रभागात प्रत्येकी ६, क प्रभागात ७, जे आणि ड प्रभागामध्ये प्रत्येकी ३, फ आणि ग प्रभागात प्रत्येकी ५, आय प्रभागात २ आणि ई प्रभागात ४ हॉटस्पॉट क्षेत्रांचा समावेश आहे. अनलॉकमध्ये नागरिकांचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हेच चित्र हॉटस्पॉटमध्ये निर्बंध घालूनही सदैव दिसत आहे. परिणामी हॉटस्पॉटमधील रूग्णसंख्येवर अंकुश आणताना महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची कसोटी लागल्याचे पाहयला मिळत आहे. गेल्या सोमवारी ग प्रभागक्षेत्र अंतर्गत तुकारामनगरमधील हॉटस्पॉट क्षेत्र सील करण्यात आले होते. परंतु नागरिकांचा सील करण्यास तीव्र विरोध झाला होता. शनिवारी कल्याणमधील क प्रभागातील पारनाका येथील हॉटस्पॉट सील करण्यात आला. त्याचबरोबर अन्य ठिकाणचे हॉटस्पॉटही सील करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.चाचणीसाठी गृहसंकुलांनी घेतला पुढाकारइमारतींमध्ये कोरोना वाढत असल्याचे केडीएमसीच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव पाहता ठाकुर्ली पूर्वेतील कल्याण- डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याच्या परिसरात असलेल्या सर्वाेदय लीला या गृहसंकुलातील रहिवाशांनी पुढाकार घेत शनिवारी अॅण्टीजेन चाचणीची विशेष मोहीम राबविली.सर्वाेदय लीला सोसायटी आणि साईलीला उत्सव मंडळ यांच्या वतीने झालेल्या चाचणी मोहिमेला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सचिव लक्ष्मण इंगळे आणि योगेश शेलार यांनी दिली. केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या डॉ. अनुपमा साळवे या उपस्थित होत्या.
कल्याण पश्चिमेतील कोरोनाचे हॉटस्पॉट पुन्हा होणार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 6:48 AM