ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुकीकरणासाठी पुढील २४ तास बंद ठेवण्यात आले आहे. तर या महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर चार ते पाच कर्मचाऱ्यांना घरातच क्वॉरान्टाइन करण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. ठाणे महापालिका हद्दीत दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. तिकडे अत्यावश्यक सेवेत असलेले कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयातील परवाना विभागातील कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता मुख्यालयातील चवथ्या मजल्यावरील आरोग्य विभागही आता अडचणीत आला आहे. सध्याच या विभागातून शहरातील कोरोना विषयीची माहिती, आढावा घेतला जात आहे. तसेच कोरोनावर कशा पध्दतीने उपाय योजना करणे गरजेचे आहे, याविषयाचीही माहिती उपलब्ध होत आहे. परंतु आता याच विभागातील एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला लिपीक पदावर काम करीत असून ती कल्याण शहरात राहते. अशक्तपणा तसेच प्रकृती ठिक नसल्यामुळे शुक्र वारपासून ती कामावर येत नव्हती. त्यामुळे तिची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल बुधवारी आला असून त्यात तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला उपचारासाठी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी शुक्र वारपर्यंत ही महिला कामावर येत होती. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच कर्मचाºयांना होम क्वॉरान्टाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तर आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढील २४ तास बंद करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातच कोरोनाचा रुग्ण, आरोग्य विभाग २४ तास ठेवणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 3:35 PM