ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समीतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यानुसार ठाण्यातील उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा व्हावा, आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढली जाऊ नये, अशा अनेक सूचना या बैठकीत बुधवारी करण्यात आल्या.
मुख्य पदाधिकाऱ्यांची आॅनलाइन बैठक बुधवारी रात्री घेऊन काही सूचना ठरविण्यात आल्या. बाप्पांचे आगमन किंवा विसर्जन करताना गरजेपुरतेच कार्यकर्ते असावेत. गणेश मंडपात सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते नसावेत, मंडपात प्रवेश करताना सॅनिटाइजर व थर्मामीटरची व्यवस्था बंधनकारक राहील, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मास्क, ग्लोव्जसारखी सुरक्षित उपकरणे वापरणे बंधनकारक राहील, श्रींच्या आरतीच्या वेळीदेखील पाच ते सहा कार्यकर्त्यांनाच मंडपात मुभा राहील, कोणतेही सत्कार समारंभ अथवा इतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले जाणार नाहीत.
दर्शन करण्यासाठी येणाºया भाविकांची गर्दी होणार नाही याची जबाबदारी सर्वप्रथम मंडळांची असेल, गणेश मूर्तीसोबत कोणतेही रेकॉर्डिंग शो यावेळी असणार नाहीत, मंडप दिवसातून दोनदा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी प्रशासनासोबत मंडळांचीदेखील राहील, मंडपात विभागाजवळचे कोरोना वैद्यकीय हॉस्पिटल, रुग्णवाहिका, डॉक्टर, पोलीस यांचे संपर्क क्रमांक बोर्ड असणे बंधनकारक राहील, कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी गणेश मूर्तीची निगा कमीत कमी लोक राखू शकतील अशी असावी, शक्यतो ध्वनिक्षेपकाचा वापर टाळावा, प्रशासन ,पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांना सर्वतोपरी सहकार्य होईल, याची काळजी घेत सर्व नियम पाळावेत.
उत्सव साधेपणाने पार पाडताना निधी उरत असेल तर हॉस्पिटल अथवा वैद्यकीय संस्था यांना ऐच्छिक मदत करावी, गणेशोत्सव काळात सोशियल डिस्टन्सचे पालन करत रक्तदान शिबिराचे आयोजन करून देशात असलेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारी रक्तपेढ्यांना संपूर्ण सहकार्य करावे, आदी सूचना जिल्ह्यातील गणेश मंडळांना करण्यात येणार आहेत. या सर्व सुचना याच वर्षासाठी मर्यादित आहेत. पुढील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास यामध्ये बदल केले जावू शकतात.ही नियमावली नाही तर मंडळांसाठी पाळावयाची सूचनावली आहे, असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी सांगितले. शासन स्तरावर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन नियमावली जाहीर करण्याची मागणी समितीने केली.