ठाणे: गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची उत्तम परंपरा ठाण्यात आहे. कोरोनामुळे त्यात खंड पडला. परंतु, यावर्षी ही परंपरा पुन्हा सुरू होत आहे. स्वागत यात्रेच्या तयारीकरिता वेळ कमी असला, तरी ठाणेकरांचा उत्साह प्रचंड आहे, अशा भावना यंदाच्या स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केल्या. एका बाजूला नववर्षाचे स्वागत करूया आणि दुसऱ्या बाजूला कोरोना कायमचा गायब होईल अशी प्रार्थना करूया, असेही ते म्हणाले. स्वागत यात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेच्या तयारीकरिता श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित शेवटची सभा सोमवारी रात्री ज्ञानकेंद्र सभागृहात पार पडली. यावेळी डॉ. काकोडकर उपस्थित होते. ते म्हणाले की, शोभायात्रेपेक्षा स्वागत यात्रा हे जास्त सयुक्तिक वाटते. यावर्षी स्वागत यात्रेचे अप्रूप आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम सुरू असतात त्याचे एकरुप या स्वागत यात्रेत ठाणेकरांना पाहायला मिळेल. यात थोडासा भाग विज्ञानाचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एखादा समाज किती प्रगल्भ आहे याचे मोजमाप त्या समाजाची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृती, पूजाअर्चा आणि सण साजरा करण्याची पद्धती यावरून करता येते. स्वागतयात्रेत ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे इस्रोला वैज्ञानिक प्रगतीसाठी कोटी कोटी प्रणाम अशा आशयाचा बँनर लावून स्वत: ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत.
स्मित संस्थेतर्फे वृद्ध, अपंग आणि बेघर यांचे प्रश्न मांडले जाणार आहेत. तेली समाजाच्या वतीने पायी वारी असणार आहे. भारतीय मराठा महासंघ गजानन महाराज चौक येथे पालखीचे स्वागत करणार आहे. तसेच, स्वागत यात्रेदरम्यान कुठेही कचरा दिसला तर तो कचरा उचलणारा ट्रक यात्रेत सहभागी होणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ग्रंथयान, राज्याभिषेक समारोह समितीतर्फे संभाजीमहाराजांना श्रद्धांजली वाहणारा चित्ररथ, सरस्वती शाळेचे दोन प्रकल्प यात्रेत सहभागी होऊन डॉ. काकोडकर यांना मानवंदना दिली जाणार आहे. पर्यावरण दक्षता मंडळाचा ‘फुलपाखरू’ विषयावर चित्ररथ असेल. विविध चित्ररथ, संस्था यात्रेत सहभागी होणार आहेत.