मीरा रोड - कोरोना संसर्गातून बरे झालेल्या मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी रक्तातील प्लाझ्मा दान करून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना देखील प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईच्या एन. आर. भगत एज्युकेशन शाळेत प्लाझ्मा संकलन करणारे शिबीर आयोजित केले होते. त्याच धर्तीवर मीरा भाईंदरमध्ये देखील प्लाझ्मा संकलन शिबिराचे आयोजन करण्याची मागणी आमदार गीता यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा पद्धत देखील उपयुक्त ठरत असल्याने आयुक्तांनी महापालिकेच्या मीरारोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू केले. त्याचे ई - उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक व रवींद्र फाटक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त, नगरसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार गीता यांच्यासह अन्य काही कोरोनामुक्त नागरिकांनी प्लाझ्मा दान केले. शहरातील ज्या नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे व ते आता बरे झाले आहेत त्यांनी देखील प्लाझ्मा दान करून आपल्या अन्य कोरोनाग्रस्त नागरिकांना बरे करण्याचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आ. गीता यांनी केले.