ठाणे : चातुर्मास सुरू होण्याच्या दोन दिवस आधी साजरी केली जाणारी कांदेनवमी यंदा सोमवारी, २९ जूनला कोरोनामुळे घरात साजरी करण्यात येणार आहे. गरमागरम कांदे भजी, तिखट-गोड चटणी आणि गरमागरम चहा असा बेत ठाणेकरांनी केला आहे. कांदेनवमी खुशाल साजरी करा, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी केले आहे. कांदाभजी करण्यापूर्वी व खाण्यापूर्वी हात एक मिनिटभर स्वच्छ धुवा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत ‘चातुर्मास असतो. धार्मिक नियमांप्रमाणे चातुर्मासात कांदा, लसूण खाऊ नये, असे सांगितले जाते. त्यामागे वैज्ञानिक कारण म्हणजे पावसाळ्यात कांदा-लसूण पोटाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे महाराष्ट्रात चातुर्मास पाळणारे लोक एक दिवस अंतर ठेवून कांदेनवमी साजरी करतात.
कांदेनवमी ही पंचांग-दिनदर्शिकेत दाखविण्याची पद्धत नाही. पण, ती अनेक ठिकाणी साजरी केली जाते. यावर्षी बुधवारी १ जुलैला आषाढी-देवशयनी एकादशी आहे. एक दिवसाचे अंतर ठेवून आषाढ शुक्ल नवमीला कांदेनवमी साजरी केली जाते. सुमारे सात हजार वर्षांपासून कांदे आहारात वापरले जातात. वर्षातून दोन वेळा पीक घेतले जाते, अशी माहिती सोमण यांनी दिली.व्हिडीओ कॉलद्वारे एकत्रतीन-चार प्रकारांची कांदाभजी, त्याचबरोबर इतर भजीही तयार करून विविध प्रकारांच्या तिखट-गोड, लाल-हिरवी चटणी, गरमागरम चहा, त्यानंतर गप्पांची मैफल आणि त्यात पाऊ सधारा असतील, तर आणखीनच मजा येते. यंदा कोरोनामुळे एकमेकांच्या घरी जाण्यावर निर्बंध आल्याने घरातल्या सदस्यांसोबतच हा कांदेनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. एकमेकांना व्हिडीओ कॉल करून आपण केलेली गरमगरम भजी दाखवून या उत्सवाचा आनंद लुटला जाणार आहे.