परिचारिका या प्रत्येक रुग्णालयातील रुग्ण व डॉक्टर यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. या सिस्टर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावतात; पण दीड वर्षापासून कोविडच्या काळात त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आपल्यापासून आपल्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रसंगी काही महिने घरापासून लांब राहून कोविड रुग्णांची सेवा करीत आहेत. या काळात अनेक परिचारिकांनाही कोरोनाची बाधा झाली, पण त्यातून बरे झाल्यानंतर मनात कोणतीही भीती न ठेवता त्या पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाल्या. इतकेच काय तर जोमाने रुग्णांची सेवा करीत आहेत. दुर्दैवाने काही परिचारिकांनी आपले प्राणही गमावले.
सध्या लसीकरण केंद्रांवरही लसीकरणातही परिचारिका हिरिरीने सहभागी होऊन नागरिकांना लस देत आहेत. या परिचारिकांचे कौतुक करावे, त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी बुधवारी म्हस्के यांनी ठाण्यातील काही लसीकरण केंद्रांवर भेटी दिल्या. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी परिचारिकांचे कौतुक केले.
धैर्याने लढण्याची ग्वाही
जागतिक परिचारिका दिनानिमित्त यावेळी केक कापण्यात आला. म्हस्के यांच्या या खास भेटीबद्दल लसीकरण केंद्रावरील सर्व परिचारिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले, तर कोरोनाचा नायनाट होईपर्यंत आम्ही धैर्याने लढू, अशीही ग्वाही यावेळी परिचारिकांनी म्हस्के यांना दिली.
----------------------