ठाणे: ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांचे शनिवारी करोना या आजाराने निधन झाले ते ४६ वर्षाचे होते. ठाणे पोलीस दलातील मृत्यूची संख्या ४ झाली असून पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
लॉकडाऊनमध्ये कोरोना संकटाच्या काळात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलीस दलातील कोरोना योद्धांना करोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दलात देखील करोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असून शनिवारी दुपारी चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
भिवंडी येथे राहणारे पोलीस पोलीस नाईक यांची करोना चाचणी करण्यात आली होती, २५ जून रोजी त्यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला कारणाने त्यांना ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २ जुलै रोजी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ठाणे पोलीस दलातील करोनाने मृत्यु झालेल्याची संख्या ४ झाली असून ठाणे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ठाणे पोलीस दलात गुरुवारी एकाच दिवसात ३५ करोनाचे रुग्ण आढळून आले आहे. त्यात ५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ठाणे पोलीस दलात करोना बाधित पोलिसांची संख्या ५९८ झाली असून त्यात ५९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.