जव्हार : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या हजरत औलिया शाह सदरोद्दीन्न बदरोद्दीन हुसैनी चिश्ती (र.अ.) यांचा ५६८ वा उरुस या वर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
कोरोनामुळे सध्या लोक धास्तावले आहेत. यामुळे गर्दी होणारे अनेक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. त्यामुळे या उरुसाचे यंदा तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत संदल व चादर या मुख्य विधीसह उरूस साधेपणाने साजरा करण्यात आला.
दरवर्षी उरुसाच्या पहिल्या दिवशी फक्त मोजके फकीर व कशिदा गायन करणाऱ्या व्यक्तींच्या उपस्थितीत जामा मस्जिद येथून मिरवणूक निघाली. मस्जिदपासून पाचबत्ती नाका व नेहरू चौकातून पुन्हा दर्ग्याकडे येऊन पवित्र संदल व शिरनी वाटप करण्यात आली. जव्हारचा हा शाही उरुस म्हणजे जव्हारच्या इतिहासातले एक महत्त्वाचे पान आहे. राजेशाही नसली तरी आजही ही परंपरा हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने पाळत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला.