ठाणे : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी १४५ ने वाढली. यामध्ये सर्वाधिक ६४ रुग्ण ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक हजार ६५८ झाली आहे. तसेच गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४४ वर गेला.
गुरुवारी ठामपा कार्यक्षेत्रात सापडलेल्या ६४ नव्या रुग्णांमध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश असून तेथील रुग्णसंख्या ५५९ झाली आहे. ६४ पैकी ३४ रुग्ण हे लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती परिसरातील आहेत. याखालोखाल नवी मुंबईत ४४ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ४८४ वर पोहोचली आहे. तर केडीएमसीत आढळलेल्या २० रुग्णांमुळे रुग्णसंख्या २५३ झाली आहे. मीरा-भार्इंदर येथे नवे ६ रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णसंख्या दोनशेपार झाली असून ती आता २०२ वर स्थिरावली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ७ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या ६५ वर गेली आहे.बदलापूरला ही तीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ४५ झाली आहे. अंबरनाथ येथे एक रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या १२ झाली आहे.
उल्हासनगर आणि भिवंडीत एकही बाधित न सापडल्याने तेथील रुग्णसंख्या स्थिर असून ती अनुक्रमे १७ आणि २० अशी आहे. तर गुरुवारी दगावलेल्या दोनपैकी एक ठाणे आणि दुसरा मीरा-भार्इंदर या महापालिका कार्यक्षेत्रातील असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
नवी मुंबईमध्ये गुरुवारी ४४ जणांना लागण झाली असून रुग्णसंख्या ४८४ झाली आहे. दिवसभरात १५ रुग्ण बरे झाले आहेत.सर्वाधिक १० रुग्ण वाशी विभागात वाढले. कोपरखैरणे व घणसोलीत प्रत्येकी ९, तुर्भे सानपाड्यात ७, नेरूळमध्ये ४ आणि ऐरोलीसह दिघामध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला. गुरुवारी एपीएमसीमध्ये नवीन रुग्ण सापडल्याने मार्केट बंद करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. बेलापूरमधील ६, वाशी ३, तुर्भे २ व घणसोलीत, ऐरोलीसह दिघामध्ये प्रत्येकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. सानपाडामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील १,३१२ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
डॉक्टरचा कोरोनामुळेच मृत्यूसीवूड सेक्टर ४८ मधील डॉक्टरचा रविवारी व त्यांच्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला होता. गुरुवारी डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्नीच्या रिपोर्ट पुन्हा तपासणीस पाठविला आहे. त्यांच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.