ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १५४ रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्याही एक हजार ८०९ इतकी झाली आहे. तसेच दोघांचा मृत्यू झाला आहे. यात ठाणे महापालिकेने ६०० तर नवी मुंबईने ५०० च्या आकड्याची सीमारेषा पार केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५१ रुग्ण हे ठामपा कार्यक्षेत्रात नोंदवले गेले असून अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे नवीन रुग्ण आढळला नाही.
ठाणे महापालिका हद्दीत सलग तिसऱ्या दिवशी सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी सापडलेल्या ५१ पैकी १५ रुग्ण हे लोकमान्यनगर -सावरकरनगर प्रभाग समितीमधील आहेत. त्या पाठोपाठ वागळे इस्टेट -१४ आणि दिवा येथील १२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे ठामपामधील एकूण रुग्ण संख्या ६११ इतकी झाली आहे. तर कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत २७ नवे रुग्ण सापडले असून त्यामधील २० रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि वाशी येथे कामाला जाणारे आहेत.
यामध्ये १७ पुरुष व १० महिला रुग्णांचा समावेश आहे. तसेच नवी मुंबईत रुग्ण संख्याही आता ५२७ वर पोहोचली आहे. भिवंडीत एक नवा रुग्ण सापडल्याने येथील संख्या ही २१ झाली आहे. बदलापुरात ४ रुग्ण मिळाल्याने येथील एकूण रुग्ण संख्या ४६ झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये २१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या २२३ झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ही ७ नवे रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या ७२ वर पोहोचली आहे. तसेच अंबरनाथ आणि उल्हासनगर येथे एकही नवा रुग्ण न मिळाल्याने रूग्णसंख्या अनुक्रमे १२ आणि १७ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.