ठाणे : सोमवारी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात एका दिवसात बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली असून चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर ठाणे महापालिका क्षेत्रात बाधितांची संख्या आटोक्यात असली तरी तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत १९० रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारी दोन हजार ३७८ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे. दुसरीकडे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत शंभर रुग्ण बरे झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.सोमवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ७७९ इतकी झाली असून मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. तर, ठाणे महापालिकाक्षेत्रात ४० कोरोनाबाधीतांची नोंदीसह तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा थेट ७५२ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २८ वर पोहोचला आहे. उल्हानगरमध्ये नऊ रुग्णांच्या नोंद झाली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधीतांचा आकडा ४७ झाला असून मृतांचा आकडा तीन झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत २३ रुगांची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा ३४४ इतका झाला. मीरा-भार्इंदरमध्ये एका नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा २५७ इतका झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात दोन नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा २७ झाला आहे. बदलापूरमध्ये दोन रुग्णांच्या नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा ५६ वर गेला आहे. तसेच अंबरनाथमध्येदेखील दोन रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा १८ वर गेला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात सहा नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील बाधितांचा आकडा १०० वर गेला आहे.वसई-विरारमध्ये २२४ रुग्णवसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी वसई, विरार व नालासोपारा भागात १८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. विरार भागात राहणारी एक मुलगी आणि नालासोपाऱ्यातील८ वर्षांच्या मुलाचा यात समावेश आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मात केलेल्यांची संख्या १२५ झाली आहे. तर, एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२४ वर पोहोचली आहे.विविध उपाययोजनाठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. त्यात शनिवारी, रविवारप्रमाणे सोमवारीही बाधितांच्या आकडेवारीची स्थिती जैसे थे असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे
coronavirus: ठाणे जिल्ह्यात १९० बाधित, नऊ जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या २३७८ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 4:47 AM