- नारायण जाधवठाणे : ठाणे जिल्ह्याने अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या बाबतीत मुंबईला मागे टाकले असले, तरी रुग्ण बरे होण्याच्या रुग्णसंख्येतही मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि विस्तीर्ण ग्रामीण पट्टा असलेल्या या जिल्ह्यात ८ जुलै अर्थात बुधवारी संध्याकाळपर्यंत बरे झालेल्या रुग्णांनी २५ हजारांचा पल्ला गाठला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात २५ हजार ६५४ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात सहा महिन्यांच्या लहान बाळापासून १०४ वर्षांपर्यंतच्या वृद्धानेही कोरोनावर मात केलेली आहे.प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४२ हजार ९८६ चाचण्या केल्या असून त्यात ९५ हजार ४७३ रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ४७ हजार ६३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी २० हजार पाच अॅक्टिव्ह रुग्णांवर विविध शहरांत उपचार सुरू असून २५ हजार ६५४ कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. जिल्ह्यातील सहा महापालिकांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांसह ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने मार्च महिन्यापासून राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळेच हा २५ हजारांचा पल्ला गाठता आला आहे. बरे होण्याची ही आकडेवारी ५३ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात बुधवारी रात्रीपर्यंत १४०४ मृत्यू झाले आहेत.बरे झालेले रुग्ण जास्तठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर, भिवंडी, अंबरनाथ या शहरांत अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, जि.प. सदस्य, अनेक नगरसेवकांसह पत्रकार, विविध कर्मचारी, पोलिसांसह बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एसटी कर्मचाऱ्यांनाही ड्युटी करताना कोरोनाची लागण झाली आहे. यात बहुसंख्य जणांनी कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा आपली सेवा देण्यास सुरुवात केली आहे.
coronavirus: ठाणे जिल्ह्यात २५ हजार ६५४ रुग्ण ठणठणीत, योद्ध्यांची मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 1:47 AM