कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोना रुग्णांना सुरुवातीच्या काळात बेड मिळत नसल्याने मनपाने जंबो सेटअप उभारला आहे. आतापर्यंत चार ठिकाणी कोविड रुग्णालये उभारली असून, त्यात ७६२ बेडची सुविधा आहे. मात्र, आजमितीस तेथे मध्यम आणि गंभीर स्वरूपाचे ५५५ रुग्ण उपचार घेत असून, उर्वरित २६७ बेड रिक्त आहेत.
केडीएमसी हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा प्रशासनाने मनपाचे डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून जाहीर केले. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असल्याने तेथील फक्त ६३ बेड कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध झाले. तसेच मनपाने तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहित केली. मात्र, तरीही रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे मनपाने डोंबिवलीत क्रीडासंकुल, जिमखाना, पाटीदार भवन तसेच कल्याणमधील आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली आणि काळसेकर शाळा येथे कोविड रुग्णालये उभारण्याचे काम हाती घेतले. त्यापैकी क्रीडासंकुल, जिमखाना, पाटीदार भवन व काळसेकर शाळा येथे रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत.तर, आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली व टिटवाळा येथील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मनपाने सुरुवातीपासूनच टाटा आमंत्रण येथे दोन हजार ४३८ बेडची सोय केली आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी चार हजार ७७४ बेड ठेवले पाहिजेत. मात्र, मनपाकडे सध्या तीन हजार ४७४ बेड उपलब्ध आहेत. मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी एक हजार ५९१ बेड असले पाहिजेत. मात्र, पालिकेने ६७४ बेड तयार केले आहेत. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी एक हजार ५९१ बेड असले पाहिजेत. मात्र, मनपाकडे खाजगी रुग्णालये मिळून एक हजार पाच बेड आहेत. मनपाने अधिग्रहित केलेल्या आर. आर., निआॅन आणि हॉली क्रॉस या रुग्णालयांचा कोविड परवाना संपणार आहे. त्यामुळे मनपाला परवाना नूतनीकरण अथवा तो न करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.दुसरी लाट आल्यास हीच यंत्रणा ठरेल उपयोगीसरकारकडून मिळालेल्या १७ कोटींच्या निधीतून उभारलेल्या कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्ण न आल्यास ती ओस पडतील; तसेच केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. दुसरीकडे, अनलॉकमुळे नागरिक बाहेर फिरत असल्याने कोरोनाची दुसरी लाट उसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उभारलेली यंत्रणा उपयोगी ठरू शकते, असा दावा मनपा प्रशासनाचा आहे. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रमाण हे केवळ तीन टक्केच आहे. असे असताना बेडची संख्या वाढवत नेणे हे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.