कल्याण - कल्याणडोंबिवलीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आज महापालिका हद्दीत 3 नवे रुग्ण आढळून आले.महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे.3 रुग्णापैकी एक रुग्ण हा डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचा वाडा परिसरातील आहे. याच परिसरातील भाजपा नगरसेवक व स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे व भाजप नगरसेविका कविता म्हात्रे यांनी परिसरातील नागरीकांना आवाहन केले आहे. या परिसरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. परिसरातील नागरीकांनी घराबाहेर फिरु नये. घराबाहेर निघून फिरताना नियम तोडताना आढळून आल्यास संबंधितांच्या विरोधात पोलिस कारवाई केली जाईल अशा इशारा दिला आहे. कोरोना बाधित रुग्णांचे निकट सहवासित असलेली 60 वर्षीय महिला व सहा महिन्याचे बाळ हे कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील आहे.कालर्पयत महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 21 होती. आत्ता त्यात नव्या 3 रुग्णांची भर पडली आहे. डोंबिवलीतील वादग्रस्त लग्न सभारंभात उपस्थित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. उपचारा अंती ही महिला बरी झाली आहे. तिला घरी सोडण्यात आले आहे. ही महिला धरुन यापूर्वी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णापैकी पाच जणांना तपासणी अंती घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कस्तूरबा रुग्णालयात महापालिका क्षेत्रतील 19 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.दरम्यान महापालिका हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोनासाठी स्वतंत्र अत्याधुनिक रुग्णालय सुरु करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासमोर एक इमारत महापालिकेच्या ताब्यात आहे. वैद्यकीय वापरारासाठी तिचा उपयोग होऊ शकतो. त्याठिकाणी 10 हजार चौरस फूटाची जागा आहे. या जागेत कोरोनासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज रुग्णालय तातडीने सुरु करता येऊ शकते. याचा विचार करण्यासाठी आयुक्तांनी त्याठिकाणी जाऊन स्वत: पाहणी करावी. उपलब्ध तयार इमारतीतील जागेचा वापर वैद्यकीय कारणासाठी करावा. जेणे करुन रुक्मीणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयावर वैद्यकीय ताण येणार नाही याकडे नगरसेवक म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.
coronavirus : कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचे 3 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 24 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 3:32 PM
नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
ठळक मुद्दे नव्या रुग्णांमध्ये एक पुरुष व महिलेसह सहा महिन्याचा बाळाचा समावेशकेडीएमसी महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 24