हुसेन मेमन
जव्हार - तालुक्यातील कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढत असून आश्रमशाळेतील 37 मुले तर त्याच शाळेतील 3 शिक्षक व आदिवासी विकास विभागाचे विनवळ येथील सेंट्रल किचनचे 16 कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर नगर परिषद हद्दीतील 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्यामुळे जव्हार तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाचे विनवळ आश्रमशाळेतील श्रीशक्ति संस्थेचे सेंट्रल किचन येथील 16 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांना किरकोळ लक्षणे असून यातील काही रूग्णांना विक्रमगड येथील रिव्हेरा या कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे. तर तीन चार दिवसांपूर्वी हिरडपाडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील ई. 10 ते 12 वर्गात शिक्षण घेत असलेले 9 विद्यार्थी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथे तपासणी साठी आणण्यात आले होते, एकाच शाळेतील 9 विद्यार्थ्यांना एकाच वेळी ताप, सर्दी, खोकला येत असल्याने, डॉक्टरांना संशय आला, त्यांची तेथे अँटिजेन तपासणी केली असता नऊचे नऊ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले.
हे धक्कादायक वास्तव समोर आल्यावर तातडीने आश्रमशाळेतील विद्यार्थी व हिरडपाडा गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात शाळेतील 28 विद्यार्थी पॉझिटिव्ह तर 3 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले, असे हिरडपाडा शाळेतील एकूण 37 विद्यार्थी व 3 कर्मचारी असे 40 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना किरकोळ लक्षणे असून, त्यांना जव्हारच्या मुलींचे वसतिगृह येथील सी. सी. सी. सेंटर मध्ये दाखल करण्यात आले आहेत. तसेच आजपर्यंत 72 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले असून, जव्हार येथील कोविड सेंटरही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत, नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, लग्न समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकवा जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. - डॉ. किरण पाटील, जव्हार तालुका आरोग्य अधिकारी