कल्याण: कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना बाधित असलेले नवे सहा रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 34 झाली आहे. यामध्ये तरुण परिचारिकेस कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महापालिका हद्दीत दररोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असल्याने कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.
नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित सहा रुग्णांपैकी डोंबिवली पश्चिमेतील तीन आणि एक जण डोंबिवली पूव्रेतील आहे. दोन जण कल्याण पश्चिमेतील आहेत. डोंबिवली पश्चिमेतील एक 22 वर्षीय तरुणी जसलोक रुग्णालयात परिचारिका आहे. तिला कोरोनाची लागण झाली आहे. त्याबरोबर 30 वर्षीय तरुण कोराबाधीताच्या संपर्कात आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील 65 वर्षीय वृद्धाला मधूमेह व उच्च रक्तदाबाचा आजार असल्याने त्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
डोंबिवली पूव्रेतील 30 वर्षीय महिला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोराना झाला आहे. कल्याण पश्चिमेतील 38 वर्षीय गृहस्थ कोरोना बाधित रुग्णाच्या सहवासात आल्याने त्याला कोरानाची लागण झाली आहे. तर 55 वर्षीय महिलेस कोरना झाला आहे. एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत काल कोरोना आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील 67 वर्षीय महिलेचा समावेश आहे. डोंबिवलीतील लग्न सोहळ्य़ात सहभागी झालेल्या रुग्णाला कस्तूरबा रुग्णालयात पुनर्तपासणीकरीता पाठविले होते. त्याच्या तपासणी अंती त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या सहा आहे. त्यामध्ये कल्याणचे चार आणि डोंबिवलीतील दोघांचा समावेश आहे.
महापालिकेच्या ज्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची शोध मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरु आहे. ही शोध मोहिम 210 आरोग्य पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. महापालकेने तापाच्या उपचारासाठी आठ दवाखाने सुरु केले आहे. तसेच शास्त्रीनगर रुग्णालय हे आयसोलेशन रुग्णालय घोषित केले आहे. त्याचबरोबर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कालपासून दोन ड्रोनद्वारे पाहणी केली जात आहे.
कल्याण बाजार समितीत केवळ घाऊक बाजार सुरु ठेवला आहे. 12 ठिकाणी भाजीपाला विक्रीची सुविधा करुन दिली आहे. खाजगी डॉक्टरची आणि रुग्णालयाची मदत घेतली जात आहे. ज्या सोसायटीत कोरोनाचा रुग्ण आढळून येत आहे. ती सोसायटी लॉकडाऊन केली जात आहे. याशिवाय कल्याण डोंबिवलीत खाजगी वाहनांना प्रवेश बंदी केली गेली आहे.