ठाणे - ठाण्यातील झोपडपट्टीचा भाग असलेल्या आनंदनगर आणि गांधीनगरमधील ६२ संशयित नागरिकांना शनिवारी कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे. मुलुंडच्या ज्या खाजगी रुग्णालयात कोरोना पॉझीटीव्ह महिलेला दाखल करण्यात आले होते त्याच हॉस्पिटलमध्ये आनंदनगर मधील ८ लोक कामाला होते. त्यामुळे या ८ लोकांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळी अशा एकूण ६२ लोकांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच सर्व परिस्थिती स्पष्ट होणार आहे.यामध्ये महापौर नरेश म्हस्के यांनी महत्वाची भूमिका बजावली असून आनंदनगरमधील जे लोक या रुग्णालयात कामाला होते त्यांचा शोध घेऊन प्रशासनाशी योग्य समन्वय सांधून त्यांना विलगीकरण कक्षात हलवण्यासाठी प्रशासनाला मदत केली आहे . तर मुलुंडच्या ज्या रुग्णालयात ही ८५ वर्षाची महिला दाखल होती ते हॉस्पिटल बृहनमुंबई महापालिकेच्या वतीने सील करण्यात आले आहे . मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये एकीकडे कोरोनाने शिरकाव केल्यानंतर ठाण्यातील झोपडपट्टीमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईचे राहवासी असलेल्या परदेशी जाऊन ८५ वर्षाच्या महिलेला मुलुंड पश्चिमेला असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला जुलाब होत असल्याने तीला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला ताप देखील आल्याने तिची तपणासी करण्यात आल्यानंतर २५ तारखेला ही महिला कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले . तिच्या मुलाला आधीच कोरोनाची लागणी झाली असल्याचे स्पष्ट झाले हते मात्र त्यावेळी ही महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता या महिलेला कोरोनाची लागणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाण्यातील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहत असलेले ८ लोक याच रुग्णालयात कामाला असून यातील सफाई कर्मचारीमी नर्स आणि आया अशा पदावर काम करतात. ही माहिती मिळताच महापौर नरेश म्हस्के यांनी टी वॉर्डशी संपर्क करून या सर्व ८ लोकांची नावे आणि घराचे पट्टे मिळवले. तसेच प्रशासनाशी योग्य समन्वय साधून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्या मुलुंडच्या रुग्णालयात हे ८ जण कामाला होते त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी अशा एकूण ६२ लोकांना कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात शनिवारी रात्रीच हलवण्यात आले आहे . झोपडपट्टीचा भाग असल्याने या ठिकाणी विशेष दक्षता देखील घेण्यात येत असल्याचे माळवी यांनी सांगितले. या सर्वांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढची परिस्थिती स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . आनंदनगर आणि गांधीनगर झोपडपट्टीतील लोकसंख्या ही २२ हजारांच्या घरात असून त्यामुळे दक्षता घेण्याचे मोठे आव्हान प्रशासना समोर आहे .
आनंदनगरमधील नागरिक धास्तावले आनंदनगरचा तसेच गांधीनगरचा परिसर हा संपूर्ण झोपडपट्टीचा परिसर असून या परिसरातील लोकसंख्या ही २२ हजारांच्या घरात आहे . शनिवारी तब्बल ६२ संशयित लोकांना कासारवडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याने या नागरिकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे . कोणत्याही नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन नागरिकांना करण्यात येत असून केवळ शौचालयासाठीच बाहेर पडा अशा सूचना नागरिकांना देण्यात येत असल्याची माहिती समाजसेवक मिलिंद बनकर यांनी दिली आहे.