ठाणे - नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने ठाणे शहरातील पत्रकार व पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी 4 मास्क आणि 2 सॅनिटायझर बॉटल अशा स्वरूपात किट वाटप. गेल्या 2 दिवसांत एकूण 2 हजार "कोरोना सुरक्षा किट" चे वाटप करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशभरातील जनता घरातील बंदिवासात आहे. त्यात, सरकारने आणि आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालनही करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्य सेवा म्हणून पोलीस, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि पत्रकार न थकता ऑन ड्युटी २४ तास दिसून येत आहेत.
पोलीसबांधव, पत्रकार मित्र आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. कोरोना सुरक्षा किट हे अत्यावश्य सेवा देणाऱ्या पोलीस, पत्रकार आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच प्रामुख्याने देण्यात आले. पोलीस रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत, प्रसंगी नागरिकांचा मनस्ताप सहन करतात. तर, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीही दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. पत्रकार मित्रही आपलं कर्तव्य बजावताना या टोकाकडून त्या टोकाकडे धाव घेताना दिसत आहेत. आपलं कर्तव्य बजावताना त्यांच्याकडून आरोग्याकडे अनपेक्षितपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे, नागरिकांसाठी सेवा देणाऱ्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य असल्याचं सांगत, आम्ही हे कीट वाटप केल्याचं वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून नेहमीच गरजू रुग्णांना आणि गरिबांना मदतीचा आधार मिळतो. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा भाग बनून शिवसेना नेते एकनाथ शिंदे काम करताना दिसून येते. यापूर्वीही, कोल्हापूरची पूरस्थिती असले किंवा इतरत्र आरोग्य कॅम्प लावणे असेल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नेहमीच गरजूंच्या मदतीला धावून जाते. कोल्हापूर आणि सांगलीतील महापूर परिस्थितीही या कक्षाकडून स्थानिकांना औषधे आणि वैद्यकीय मदत पुरविण्यात आली होती.