ठाणे - दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड १९ पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन (शस्त्रक्रिया) डिलिव्हरीची घटना ताजी असताना शनिवारी पहाटे आणखी एका पॉझिटिव्ह महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाली असून तिने साडेतीन किलो वजनाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या मायलेकांची प्रकृती स्थिर असून नवजात बालकाचा लवकर स्वॅब घेण्यात येईल, अशी माहिती या महिलेवर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली.गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता कल्याण येथील २५ वर्षीय पॉझिटिव्ह महिलेची या रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर ठाण्याच्या इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या एका २७ वर्षीय महिलेला उपचारार्थ दाखल केले होते. ती गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तिच्यावर विशेष लक्ष ठेवले होते. अचानक शनिवारी पहाटे तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यानुसार तिची पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून ही कोविड १९ पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची जिल्हा रुग्णालयातील दुसरी डिलिव्हरी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. डिलिव्हरीनंतर त्या दोन्ही बालकांना मातांनी लगेच स्तनपान सुरू केले असून पहिल्या जन्माला आलेल्या मुलीचा स्वॅब कोरोना टेस्टसाठी घेतला असून आज जन्माला आलेल्या बालकाचा स्वॅब लवकरच घेतला जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार आणि फिजिशियन डॉ. नेताजी मुळीक, डॉ सृजित शिंदे, डॉ.प्रसन्ना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अर्चना आखाडे यांनी ही डिलिव्हरी केली यावेळी डॉ. शोभना चव्हाण उपस्थित होत्या.प्रसूती तसेच डायलेसिस याचे रुग्ण येण्याची शक्यता ओळखून रुग्णालयात त्याप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी दुसरी डिलिव्हरी करण्यात आली असून बाळ-बाळंतिणीची प्रकृती स्थिर आहे.तसेच या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेची ही दुसरी डिलिव्हरी असून ती नॉर्मल केली आहे. - डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
coronavirus: ठाणे जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या कोरोनाग्रस्त महिलेची प्रसूती, बाळ बाळंतिण सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 5:57 AM