- धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी आज मंगळवार पासून शहरात 417 पथकांद्वारे घरोघरी जाऊन लक्षणे असलेल्या नागरिकांची एंटीजन टेस्ट किट ने कोरोनाची चाचणी सुरु केली आहे . शासनाने 4 हजार किट दिले असून पालिका 1 लाख 10 हजार किट खरेदी करणार आहे . अवघ्या 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल मिळणार असुन सदर सर्वेक्षण 18 जुलै पर्यंत चालणार आहे .
मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता झटपट कोरोना चाचणीचा अहवाल यावा यासाठी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांची मागणी चालली होती . त्या अनुषंगाने शासना कडून देखील 4 हजार एंटीजन टेस्ट किट महापालिका देण्यात आल्या आहेत . मंगळवारी पालिका 10 हजार किट तर येत्या काही दिवसात आणखी 1 लाख किट खरेदी करणार आहे . सदर प्रत्येक किटची किंमत 450 रुपये अधिक जीएसटी इतकी असणार आहे .
शहरातील कोरोनाची लागण झालेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी व त्यांना अलगीकरण करण्यासाठी या टेस्टचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे . महापालिकेने देखील या झटपट करून चाचणी करून घेण्यासाठी कंबर कसली आहे .
मंगळवार 14 जुलै पासून महापालिका शहरात घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी सुरु करण्यात आली आहे . सदर किट ने कशी टेस्ट करायची या बाबत पालिकेच्या 10 आरोग्य केंद्रातील परिचारिका तसेच आशा वर्कर , पालिका कर्मचारी, शिक्षक , बालवाडी आणि अंगणवाडी शिक्षिका, स्वयंसेवक यांना प्रशिक्षण दिले गेले आहे . 10 आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 417 तपासणी पथके तैनात केली आहेत .
प्रत्येक पथक रोज किमान दीडशे घरां मध्ये जाऊन कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांची तपासणी करेल . ऑक्सिजन लेव्हल कमी असणारे , श्वास घेणास त्रास , खोकला , ताप आदी कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसल्यास तपासणी केली जाईल . हे सर्वेक्षण संपूर्ण शहरात 5 दिवस चालणार असून प्रत्येक घराचे सर्वेक्षण केले जाणार आहे . या शिवाय मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूती साठी दाखल होणाऱ्या महिला व अन्य रुग्णांची देखील तपासणी सदर किट द्वारे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले .