- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाचा फटका सर्व घटकांना बसू लागला आहे. कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) दैनंदिन उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे. एरव्ही या समितीत पावणेदोन कोटी रुपयांची होणारी उलाढाल ही चार दिवसांपासून सुमारे ५० लाखांनी घटल्याची माहिती समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.थळे म्हणाले की, दिवसाला राज्यातील पुणे, नाशिक, अहमदनगर तसेच इंदोर, शिमला, गुजरात, कर्नाटक आदी परराज्यांमधूनही भाजी येते. साधारणपणे दिवसाला १७० ते २०० ट्रक भाजीपाला, फळे, असा माल येतोे; पण आता काही दिवसांपासून सुमारे १२५ ट्रक एवढाच माल येत आहे. भाजीपाला-फळांना मागणी घटली आहे, तसेच कोरोनामुळे ग्राहकही बाजारात येत नसल्याने साधारणपणे १५ ते २० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे उलाढाल घटली आहे. येत्या काळात अशी स्थिती राहिली तर मात्र परिस्थिती कठीण होईल, अशी शक्यता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी टाळण्याच्या सूचना देताना स्वच्छता ठेवा, मास्कचा वापर करा, असे सांगितले आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होऊ लागली आहे. भाज्यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन समितीने केले असून, त्याला वाहनचालक व शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.उष्णतेमुळेहीपरिणामाची शक्यतामागील दोन दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. भाजीपाल्याच्या आवकवर त्याचा किती परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तूर्तास तरी कोरोनाचा फटका बसला आहे. पुढील काळात राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार नियमांची, आदेशाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
Coronavirus : एपीएमसीतील उलाढाल ५० लाखांनी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 1:44 AM