डोंबिवली: एपीएमसीत भाज्यांची आवक बंद झाल्याने अॅपल मंडईमध्ये भाज्या येणे कमी झाले आहे, त्यामुळे त्याद्वारे ऑनलाईन भाज्या मागवणा-या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा फटका थेट भाजी विक्रेत्यांना बसला आहे.
त्यामुळे अल्पावधीतच हा व्यवसाय चर्चेत आला असला तरी भाज्याच नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली. पहाटे पासून भाज्यांचा ट्रक येणार असेल तर कल्याण, बदलापूर मार्गावर तसेच अन्यत्र ताटकळत बसावे लागते. त्यात आता दुपारपर्यंतच भाजीचा व्यवसाय करण्यास परवानगी असल्याने अॅपवर जरी मागणी आली तरीही घरपोच सेवा देतांना अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले. अॅपल मंडई ही संकल्पना नागरिकांना आवडली, सोयीची वाटल्याने सुरुवातीला गेल्या आठवड्यापर्यंत दिवसाला ७० ते ९० ऑर्डर यायच्या पण आता काही दिवसांपासून अवघ्या २०, २५ ऑर्डर येत असल्याने नियोजन करतांना गोंधळ उडत आहे.
त्यात भाज्यांचे दर दिवसागणिक बदलत असल्याने ग्राहक देखील तुलनात्मक विचार करतात. पण तरीही ग्राहकांमध्ये समाधान असल्याने काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा विक्रीला जोर येईल असा विश्वास युवा भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला. महापालिकेकडून सहकार्य मिळाले असले तरी सुरक्षा यंत्रणेला मात्र अॅपल मंडई बाबत सांगतांना काही अडचणी येत आहेत. त्यात काही मंडळींना पोलीसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून आता वाहनांना अॅपल मंडई संदर्भात ओळख लावण्यास सांगितल्याने भाज्यांची ने आण करतांना काहीसा त्रास कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर भाज्यांची आवक सुरु होणे गरजेचे असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा युवा व्यावसायिकांनी व्यक्त केली.