कल्याण : केडीएमसी हद्दीतील १०७ अक्रिडेट सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (आशा) कोविडकाळात अपुऱ्या मानधनावर स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करत आहेत. अत्यल्प मानधन मिळत असल्याने कोविडकाळात १० हजार रुपये मानधन द्यावे, अशा मागणीचे निवेदन बुधवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.केडीएमसीच्या १४ आरोग्य केंद्रांत या स्वयंसेविका कार्यरत आहेत. यासंदर्भात स्वयंसेविका गीता माने म्हणाल्या की, ‘२००५ पासून १०७ स्वयंसेविका महापालिका हद्दीत काम करीत आहेत. सुरुवातीला दरमहा ५०० रुपये मानधन दिले जात होते. आता कल्याण, डोंबिवलीत महिन्याला दीड हजार इतके अत्यल्प मानधन मिळत आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या सर्वेक्षणाचे काम जीव धोक्यात घालून करूनही हातावर दीड हजार रुपये टेकवले जाणार असतील, तर उपयोग काय’, असा सवाल त्या करत आहेत.आरोग्य विमाकवचही नाही, उपचार करणार कोण ?स्वयंसेविका संगीता प्रजापती म्हणाल्या की, सर्वेक्षणादरम्यान आम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते. आरोग्य विमाकवच नाही. कोरोना झाल्यास उपचार करणार कोण, असा प्रश्न आहे.नव्याने दाखल झालेल्या काही स्वयंसेविका भीतीपोटी काम सोडून गेल्या आहेत. त्यांना सर्वेक्षण नको. त्यामुळे सर्वेक्षणाची जबाबदारी जुन्या स्वयंसेविकांवर येऊन पडते.
coronavirus: ‘आशा’ सेविकांची प्रशासनाकडून निराशा, कोविडकाळात अपुरे मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:08 AM