ठाणे : शासकीय रुग्णालय म्हटले की, तेथील अस्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या विचित्र वागणुकीसह विविध कारणांमुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, कोरोनाच्या महामारीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णांना आधारवड वाटू लागले आहे.
या रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवेसह आपुलकीच्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे गोरगरीब रुग्णांसह अभिनेत्यांनी पसंती दिल्यानंतर आता शासकीय सेवेतील प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांसह त्यांचे नातेवाईकही पसंती देत आहेत. यात नुकतेच आरोग्य विभागातील अवर सचिव व त्यांच्या मातोश्रींसह शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखल होऊन कोरोनावर मातही केली आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयासह प्रशासनही या अधिकाऱ्यांच्या पसंतीस खरे उतरले आहे. जिल्ह्यात कोरोनाने मार्चच्या अखेरीस शिरकाव केला. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता शासनाने एप्रिलच्या सुरुवातीलाच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले.
त्यामुळे या रुग्णालयात केवळ कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांसह अधिकारी, सेलिब्रेटी आणि राजकीय पुढाऱ्यांचाही इथल्या वैद्यकीय यंत्रणोवर विश्वास दृढ झाला आहे. २०० कोरोना खाटांची सुविधा असलेल्या या रुग्णालयात १५० अतिदक्षता आणि ५० जनरल कोरोनाबाधित रुग्णांच्या खाटांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही उपआरोग्य केंद्रांच्या मदतीने कोविड केअर सेंटर उघडले आहेत. मात्र, गंभीरावस्थेत असलेले कोरोनाचे रुग्ण सामान्य रुग्णालयात दाखल केले जातात. त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नेताजी मुळीक आणि डॉ. सुजित शिंदे हे प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करीत आहेत.
सोशल मीडियावर केले कौतुकडॉक्टर्स आणि परिचारिकांकडून मिळणा:या आपुलकीच्या वागणुकीमुळे या रुग्णालयाकडे बघण्याचा रुग्णांचा व त्यांच्या नातेवाइकांचा नकारात्मक दृष्टिकोन कोरोनाच्या महामारीत सकारात्मक झाला. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यानंतर मराठी अभिनेत्याने या रुग्णालयात उपचार घेतले. यावर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र, त्या कलाकाराने जिल्हा रुग्णालयाचे सोशल मीडियावर केलेल्या कौतुकानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.