अनिकेत घमंडी
डोंबिवली: लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचा-यांची दुचाकी बिघडली तर सुरेश गॅरेजवाला सगळयांसाठी धावून येत आहे. सुरेश गुप्ता याचा गॅरेजचा व्यवसाय असून तो सांगतो की, या महामारीमुळे दुकान बंद आहे. रोजगार मिळाला नाही तरी राष्ट्रसेवेसाठी आपला हातभार लागतो, त्यातून आनंद मिळतो, म्हणुन पिशवीत सामान टाकायचे आणि जिथं गरज असेल तिथे जायचे असा प्रयत्न सुरु असतो.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सुरेशने काही दिवस घरात काढले, पण त्या दरम्यान पोलीस कर्मचा-यांचे बोलावणे आले आणि सुरेशने तातडीने सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर सगळीकडे बंद असतांना सुरेश गॅरेजवाला मात्र भर रस्त्यात उन्हातान्हात दुचाकी दुरुस्त करताना अनेकांनी बघितलं आहे. त्यामुळे काहींनी त्यांच्या दुचाकींबाबत तक्रारी केल्या. अत्यावश्यक सेवेत असतील तर सेवा मिळेल अन्यथा घरीच बसा असा सल्ला जेव्हा सुरेशने दिला तेव्हा मात्र नागरिकांनीही त्याचे कौतुक केले. आतापर्यंत त्याने 25 दुचाकी दुरुस्त केल्या आहेत.
हातावर पोट असताना स्वत:च्या पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न असताना केवळ देशहितासाठी सुरेश बाहेर पडला असून तो अत्यावश्यक सेवेतील गरजूंच्या दुचाकी दुरुस्त करून राष्ट्रकार्य करत आहे. पोलीस, आणि अन्य अधिकारी वर्गात सुरेशच्या योगदानाबाबत कौतुक व्यक्त होत आहे. कोणाला आवश्यकता असल्यास पाथर्ली पोलीस चौकीजवळ या जमेल तेवढे सहकार्य नक्की करणार असेही तो आवर्जून सांगतो.