ठाणे : ठाणे महापालिकेने उभारलेल्या १००० बेडच्या हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले आहे. शहरात दररोज १५० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत असताना, हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे.सध्या ठाणे शहरातील सिव्हिल हॉस्पिटल व अन्य खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. मुंबईतील रुग्णालयांत बेडचा शोध घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत १००० खाटांचे रुग्णालय तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. मात्र, ते का सुरू केले जात नाही. याबाबत सत्ताधारी शिवसेना व महापालिकेकडून युद्धपातळीवर हालचाली का केल्या जात नाहीत, असा सवाल डुंबरे यांनी केला.नाईकांप्रमाणेच इशारा हवा का?वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १२०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले. कोणत्याही उद्घाटनाशिवाय तातडीने रुग्णालय सुरू करण्याचा इशारा भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी दिल्यानंतर, महापालिकेने दुसऱ्याच दिवशी रुग्णालय सुरू केले होते. त्याच पद्धतीने ठाण्यातही प्रशासनाला इशारा हवा आहे का, असा सवाल डुंबरे यांनी केला.
CoronaVirus News: 'एक हजार बेडचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मुख्यमंत्रीच पाहिजेत का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 2:49 AM